मैत्रीचं अनोखं उत्तरदायित्व: दिवंगत मित्राच्या लेकीच्या लग्नासाठी वर्गमित्र सरसावले; ‘मायेचा हात’ देत जपली माणुसकी

नायगाव :- “संकटात जो धावून येतो, तोच खरा मित्र” या उक्तीचा प्रत्यय नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या २००७ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी दिला आहे. काही वर्षांपूर्वी अकाली निधन झालेल्या आपल्या वर्गमित्राच्या मुलीच्या लग्नासाठी, देश-विदेशात आणि सैन्य दलात कार्यरत असलेल्या मित्रांनी एकत्र येत मोलाची आर्थिक मदत सुपूर्द केली. मित्रांच्या या संवेदनशीलतेमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
नायगाव येथील यादव सूर्यवंशी या तरुणाचे तीन वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. घरातील कर्ता पुरुष गेल्याने सूर्यवंशी कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते. अशातच यादवच्या थोरल्या मुलीचे लग्न ठरले. ही माहिती जेव्हा त्यांच्या शालेय मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर समजली, तेव्हा “यादव नसला तरी त्याचे कुटुंब आपलेच आहे,” असा निर्धार करत सर्व मित्र एकत्र आले.
सैन्यदलापासून विदेशापर्यंत मैत्रीची साखळी
या उपक्रमासाठी अंकुशकुमार देगांवकर यांनी पुढाकार घेतला. पाहता पाहता मदतीचा ओघ सुरू झाला. जम्मू-काश्मीरमध्ये देशसेवा बजावणारे कैलास कुरे, नदीम सय्यद, संदीप कोलमवार यांच्यासह विदेशात नोकरी करणारे अविनाश राठोड व योगेश पांपटवार यांनीही आपला वाटा उचलला.
त्यासोबतच वन विभागातील प्रदीप कुंभार, मुंबई पोस्टातील मुबीन शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय चापलवार, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील अनिल पिंपळदरे, विधि क्षेत्रातील विशाल व्यवहारे, पत्रकारितेतील रामकृष्ण मोरे आणि पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथे खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व मित्रांनी मिळून मोठा निधी जमा केला.
मदत सुपूर्द करताना कुटुंब भावूक
गुरुवारी ८ मे रोजी हे सर्व मित्र यादवच्या घरी एकत्र जमले. जमलेली मदत यादव यांच्या वृद्ध आई, पत्नी आणि मुलाकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी यादवच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. “तुम्ही सगळे भावासारखे पाठीशी उभा राहिलात, आज लग्नाची चिंता मिटली,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
”शाळेत आम्ही यादवला खूप चिडवायचो, तो अतिशय कष्टाळू होता. आज तो आमच्यात नाही, पण त्याची उणीव भासू न देणे हे आमचे कर्तव्य होते,” असे साईनाथ पतके यांनी सांगितले. तर, “सोशल मीडियावरील मैत्री केवळ शुभेच्छांपुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीतून जपली पाहिजे,” असा संदेश सैन्य दलातील कैलास कुरे यांनी दिला.
नायगावच्या या तरुणांनी ‘शाळेतली मैत्री आयुष्यभर पुरते’ हे केवळ शब्दांतूनच नव्हे, तर कृतीतून सिद्ध करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.



