नरसी चौकातील वाहतूक कोंडीमुळे रूग्नवाहिकेलाही रस्ता मिळेना

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : नरसी चौकात वाहन पार्किंगचा अभाव, रस्त्यावर फेरीवाले, विक्रेत्यांचे अतिक्रमण, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे बेशिस्त वाहनचालक, रिक्षाचालकांचे कुठेही असणारे थांबे यामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. जागा मिळेल तेथे थांबणाऱ्या वाहनांमुळे शहराचे सौंदर्य तर बिघडले आहेच, त्याचबरोबर वाहतुकीच्या कोंडीची समस्याही नित्याची झाली आहे त्यामुळे पादचाऱ्यांना चालने तर सोडाच रुग्न वाहिकेलाही रस्ता मिळत नाही त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्यांचा जीव कासावीस होतो.
नरसी शहरातील वाहतुकीची समस्या जुनीच असली तरी ती सोडवण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याने वाहतूक कोंडी व कोंडी फुटत नसल्याने होणारे वाद हाणामारीपर्यंत जाऊ लागल्याने नरसी चौकातील बेशिस्त पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याकडे ग्रामपंचायत व पोलिस यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. नरसी शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र, त्या दृष्टीने वाहनतळाच्या जागांचे नियोजन न झाल्याने शहरात पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. व्यापारी संकुले, बाजारपेठांसह मध्यवर्ती परिसरांमध्ये वाहने लावायची कुठे, असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. त्यामुळे थेट रस्त्यावर वाहने लावली जात आहेत.
रस्त्यावर पहिला हक्क पादचाऱ्यांचा असल्याचे सांगितले जाते; मात्र नरसी चौकातील रस्त्यांचे चित्र पाहता, पादचाऱ्यांनी चालायचे कुठून? असा प्रश्न आता पडत आहे. कारण, रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ, फेरीवाले, हातगाडे दुकानदारांनी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यात भरीस भर म्हणून बेशिस्त वाहन पार्किंग. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यांच्या मधोमध चालण्याची वेळ येते. यातून लहान- मोठे अपघात होतात. पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागते.
नरसी चौकात मुखेड, आंध्रप्रदेश, कर्नाटक व नांदेडकडून मोठ्या प्रमाणात वाहणे येतात. त्यातच मागच्या महिणाभरापासून लगीनघाई सुरु आहे. परिणामी नरसी चौकातील वाहतूक प्रचंड वाढली असून त्यामुळे येथे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी चोवीस तास कर्मचारी आवश्यक आहेत मात्र रामतीर्थ पोलीस ठाण्याचे कारभारी याकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. ते ठाण्यात कमी आणि नांदेडला जास्त राहत आहेत. पोलीसांच्या दुर्लक्षामुळे मागच्या महिण्यापासून नरसी चौकात वाहतूक कोंडी हि नित्याचीच झाली आहे परंतु काल रविवारी मात्र तब्बल तीन ते चार तास वाहतीकीची कोंडी झाली. प्रवाशांचे जे हाल झाले ते शब्दात व्यक्त करणेच शक्य नाही.
विशेष बाब म्हणजे हैदराबाद शहरात अनेक नामांकित हाँस्पीटल असल्याने तेथे गंभीर उपचारासाठी दिवसभरात नरसी चौकातून नांदेड ते हैद्राबाद जवळपास १०० रुग्ण जातात. पण मागच्या महिणाभरापासून होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे रुग्नवाहिकेलाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अशा जीवघेण्या वाहतूक कोंडीत रुग्नवाहिका अडकल्यास रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होणारी घालमेल सांगता न येणारी आहे. या वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांना तर आपला जीव मुठीत घेवनच चालावे लागते पण अँबूलंसच्या चालकाला रस्ता काढताना दमछाक होते.
व्यापाऱ्यांचे रोडवरील अतिक्रमण व बेशिस्त वाहण धारकामुळे नरसी चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. यातून सर्वसामान्यांना तर सोडाच रुग्णवाहिकेला सुध्दा अनेकवेळा वाट मिळत नाही हे विशेष.



