लग्न वरातीत डीजे नडला : इज्जतगावात राडा, 18 जणांवर परस्परविरोधी गुन्हे

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : लग्नाच्या वरातीतील डीजे च्या आवाजावरून नायगाव तालुक्यातील इज्जतगाव येथे दोन गटात शाब्दिक वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. रविवारी, 10 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे. परस्परविरोधी तक्रारीवरून कुंटूर पोलिसांनी दोन्ही गटातील 18 जणांविरोधात सोमवारी गुन्हे दाखल केले आहेत.
इज्जतगाव येथे रविवारी लग्नसमारंभ होता. गावातील मुख्य रस्त्यावरून डीजे नेत असताना एका मोटारसायकलस्वाराला जागा मिळाली नाही. यावरून शाब्दिक बाचाबाची झाली. काहींनी ‘रस्ता मोकळा करा, डीजे चा आवाज कमी करा’ असे सांगितले. त्यावरून वाद वाढला व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कुंटूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
परस्परविरोधी फिर्यादी
1. सचिन वाघमारे यांची फिर्याद :
“गावातील मुख्य रस्त्यावरून डीजे जात असताना काही लोकांनी घरात घुसून ‘तुमची काय औकात आहे, गावात लग्नाच्या मिरवणुकीत डीजे लावून नाचता का?’ असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. ओमकार डोईफोडे, बालाजी डोईफोडे व सुनील डोईफोडे यांनी मारहाण केली,” असा आरोप आहे. यावरून ओमकार डोईफोडे, ओमकार मधुकर डोईफोडे, बालाजी डोईफोडे, सुनील डोईफोडे, विजय डोईफोडे, विठ्ठल डोईफोडे, परमेश्वर डोईफोडे, पराजित डोईफोडे, शहावत डोईफोडे सर्व रा. इज्जतगाव यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
2. विठ्ठल डोईफोडे यांची फिर्याद :
“डीजेचा आवाज कमी करा असे सांगितले असता आरोपीने आवाज कमी केला नाही. धक्काबुक्की करून मला खाली पाडले व डोक्यात दगड घालून डोके फोडले,” असा आरोप विठ्ठल डोईफोडे यांनी केला आहे. यावरून सचिन वाघमारे, महेंद्र वाघमारे, संतोष वाघमारे, संभाजी वाघमारे, जीवन पवार, अर्जुन वाघमारे, तथागत पवार, राहुल वाघमारे, स्वप्नील वाघमारे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सध्या गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पुढील तपास कुंटूर पोलीस करत आहेत.



