मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान : कोलंबी ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम, तर मरवाळी द्वितीय!
अधिकारी, सरपंच आणि केंद्रचालकांच्या टीमवर्कचे मोठे यश ; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

प्रकाश महिपाळे
नायगाव :- ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेत ग्रामपंचायत कोलंबी ने प्रथम क्रमांक पटकावून तालुक्यात अव्वल स्थान मिळवले आहे. याच स्पर्धेत ग्रामपंचायत मरवाळी ने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर द्वितीय क्रमांक संपादन केला आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींच्या डिजिटल आणि सर्वांगीण विकासाच्या कौतुकास्पद वाटचालीबद्दल संपूर्ण परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डिजिटल सेवा आणि केंद्रचालकांचे योगदान…
ग्रामपंचायतींचा कारभार पेपरलेस आणि लोकाभिमुख करण्यात दोन्ही गावांचे आमचे सहकारी केंद्रचालक श्री. हणमंत कोकुर्ले आणि श्री. ज्ञानेश्वर पांचाळ यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शासनाच्या विविध योजना, दाखले आणि डिजिटल सेवा अत्यंत गतिमानतेने गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्याबद्दल या दोन्ही केंद्रचालकांचे विशेष कौतुक केले जात आहे.
या यशामागे गावांना विकासाची नवी दिशा देणारे ग्रामविकास अधिकारी साहेब, श्री. टी. जी. रातोळीकर आणि श्री. सोनसळे यांचे उत्कृष्ट प्रशासकीय नियोजन लाभले आहे. तसेच गावाचा कायापालट करण्यासाठी अहोरात्र झटणारे दोन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली हा मैलाचा दगड पार करता आला आहे.
हा गौरव केवळ ग्रामपंचायतीचा नसून संपूर्ण गावच्या एकतेचा आणि सहकार्याचा विजय आहे. सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वर्ग, महिला बचत गट, युवक आणि समस्त ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीच्या बळावरच हा सन्मान मिळाला आहे.
तालुक्यात मानाचे स्थान मिळवल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी, दोन्ही सरपंच महोदय, सहकारी केंद्रचालक हणमंत कोकुर्ले व ज्ञानेश्वर पांचाळ आणि दोन्ही गावातील सर्व नागरिकांचे तालुकाभर अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.



