ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी ; नागरिकांच्या सुरक्षेसाठी धनराज शिरोळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रकाश महिपाळे

नायगाव : शहरातील नागरिकांची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच वाढत्या वाहतूक कोंडी, चोरीच्या घटना आणि कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्याच्या उद्देशाने संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष धनराज शिरोळे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नायगाव हे शिक्षण, व्यापार आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र असून शहरात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढत असून, काही ठिकाणी चोरीच्या घटनाही घडत आहेत. अशा परिस्थितीत शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, शैक्षणिक संस्था परिसर आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यास मदत होईल.

तसेच, वाहतूक व्यवस्थापन अधिक सुलभ होईल, अपघातांवर नियंत्रण ठेवता येईल आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल. शहरातील वाढती वर्दळ, व्यापारी पेठ, शैक्षणिक संस्था, प्रमुख चौक तसेच राष्ट्रीय महामार्गालगत चोरी, वाहतूक कोंडी आणि इतर कायदा-सुव्यवस्थेच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विशेषतः डॉ. हेडगेवार चौक ते यमुनाबाई हायस्कूल मार्ग, सराफा बाजार, व्यापारी परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारल्यास गुन्हेगारीवर आळा बसण्यास, वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यास तसेच नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला मोठा हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून लवकरात लवकर संपूर्ण नायगाव शहरात आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सीसीटीव्ही यंत्रणेमुळे पोलिसांना तपास कार्यात मदत होईल, गुन्हे उघडकीस येण्याचा वेग वाढेल आणि शहरात सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल. त्यामुळे संपूर्ण नायगाव शहरात टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी श्री. शिरुळे यांनी केली आहे.

या निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक, नांदेड तसेच नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनाही देण्यात आली आहे. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या मागणीचे शहरातून स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker