एकाच रात्री तीन चोऱ्या ; कुंटूर पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह
नांदेड-नरसी महामार्ग चोरट्यांच्या निशाण्यावर ; पहाटेच्या अंधारात लाखोंचा ऐवज लंपास

अंकुशकुमार देगावकर
नायगाव :- कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदेड-नरसी महामार्गालगत एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दि. ४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी देगाव शिवारातील वेगवेगळ्या ठिकाणी डल्ला मारत नगदी रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल तसेच दुकानातील खाद्यपदार्थ लंपास केले. या सलग घटनांमुळे कुंटूर पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
देगाव शिवारातील माणिकप्रभू पेट्रोल पंपासमोर परराज्यातील वाहन उभे असताना चालकाचा मोबाईल व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे सांगण्यात येते. ही घटना पहाटे साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे.
यानंतर चोरट्यांनी काही अंतरावर असलेल्या द गार्डन गॅलरी नर्सरी येथे मजुरी करणाऱ्या रामचंद्र गणेश चनेबोईनवाड यांच्या घराला लक्ष्य केले. कुटुंबीय झोपेत असताना घरातील लोखंडी पत्र्याची पेटी चोरून नेण्यात आली. काही अंतरावर पेटी फोडून त्यातील सुमारे २० हजार रुपये रोख, बारा ग्राम सोन्याचे नेकलेस आणि लहान मुलाच्या गळ्यातील ओमचे पान असा ऐवज घेऊन चोरटे पसार झाल्याचे सांगण्यात येते.
विशेष म्हणजे याच परिसरातील साई पेट्रोल पंपासमोरील चिंचवड यांच्या दुकानाचे पत्रे काढून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. रोख रकमेसह खाण्यापिण्याच्या वस्तूही चोरून नेण्यात आल्या. चोरट्यांनी एकाच परिसरात सलग तीन ठिकाणी चोरी करून पोलिसांना थेट आव्हान दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पहाटे तीन ते पाच या काळात चोरीच्या घटना ; मग पोलीस गस्त नेमकी कुठे?
कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गालगतची ही संवेदनशील ठिकाणे असताना पहाटेच्या वेळेत पोलिसांची गस्त नेमकी कुठे होती, असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत. महामार्गावर परराज्यातील वाहने थांबतात. वाहनचालकांची विचारपूस, संशयास्पद हालचालींवर नजर आणि रात्रीची गस्त ही पोलिसांची जबाबदारी असताना एकाच रात्री तीन ठिकाणी चोरट्यांनी हात साफ करणे ही बाब गंभीर मानली जात आहे.
‘गस्त होते की केवळ कागदावर?’
कुंटूर फाटा आणि महामार्ग परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांची नियमित गस्त असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात पहाटेच्या अंधारात चोरटे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरून चोरी करत असतील, तर पोलिसांची गस्त नेमकी कितपत प्रभावी आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. रात्रीच्या वेळी महामार्गावर संशयास्पद वाहनांची तपासणी आणि परिसरातील आस्थापनांवर नजर ठेवली जात नसेल, तर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे.
चोर-पोलिसांचा खेळ सुरू ; तपास कुठपर्यंत?
एकाच रात्री तीन चोरीच्या घटना घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. चोरट्यांचा माग काढून त्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश येते की तपास काही दिवसांनी थंडावतो, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या कुटुंबाच्या घरातून रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरीला गेल्याने पीडित कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. पोलिसांनी या तीनही घटनांचा गांभीर्याने तपास करून चोरट्यांना तातडीने जेरबंद करावे, चोरीस गेलेला ऐवज हस्तगत करावा आणि महामार्ग परिसरातील रात्रीची गस्त अधिक प्रभावी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.



