बळेगाव बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडले : नागरिकांनी काळजी घ्यावी तहसीलदार गायकवाड यांचे आवाहन

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : विष्णुपूरीच्या जलाशयात पाण्याचा वेग वाढला असल्याने एक दरवाजा उघडून पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. गोदावरी नदीतील पाण्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी बळेगाव बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडण्याच्या सुचना मिळाल्यावरुन तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी गुरुवारी सायंकाळी बळेगाव येथे हजर राहून बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडले. त्यामुळे नदी किणाऱ्यावरील गावांनी व नागरिकांना काळजी घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

तब्बल दिड ते पावने दोन महिण्यानंतर नांदेड परिक्षेत्र चांगला पाऊस पडला त्यामुळे विष्णुपूरी जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याचा वेग सुरु आहे. येणाऱ्या पाण्यामुळे विष्णुपूरी जलाशय भरत आला त्यामुळे गुरुवारी दुपारी विष्णुपूरी जलाशयाचा एक दरवाजा उघडल्याने गोदावरी नदीपात्रात १५ हजार क्यूसेस वेगाने विसर्ग होत आहे.
गोदावरी नदीपात्रात पाणी वाढल्याने नदी काठच्या गावांना धोका उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने इशारा तर दिलाच आहे पण नायगाव तालुक्यातील बळेगाव बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडण्याच्या सुचना सायंकाळी नायगाव तहसीलदारांना मिळाल्या. त्यामुळे तहसीलदार सौ. धम्मप्रिया गायकवाड यांनी तातडीने बळेगाव येथे संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेवून गेले. गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान दोन दरवाजे उघडण्यात आले.
जिल्हा प्रशासनाच्या सुचनेची तहसीलदार सौ. गायकवाड यांनी तातडीने दखल घेवून बळेगाव बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने विष्णुपूरी जलाशयातून आलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात बळेगाव बंधाऱ्यातून विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या शेतीचे होणारे नुकसान तर टळलेच पण नदीकाठच्या जवळ असलेल्या गावांना धोकाही राहीला नाही. दोन दरवाजे उघडल्यानंतर नदीकाठच्या गावांनी सावध रहावे असे आवाहन करण्याबरोबरच गावोगावी संदेशही पोहचवण्यात आला आहे.