डॉ.दिनेश निखाते यांनी मागितली देगलूर विधानसभेची काँग्रेसकडे उमेदवारी
जयवर्धन भोसीकर
नांदेड : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू असताना काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. दिनेश निखाते यांनी देगलूर विधानसभा मतदारसंघात आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे. आपल्या मागणीचा अर्ज त्यांनी मुंबईत पक्ष कार्यालयात सादर केला आहे.
नांदेडच्या काँग्रेसमध्ये आणि आंबेडकरी चळवळीत एक संयमी, उच्चशिक्षित ,अभ्यासू नेतृत्व म्हणून डॉ.दिनेश निखाते यांच्याकडे पाहिले जाते. काँग्रेसच्या एन एस यु आय या विद्यार्थी चळवळीपासून त्यांनी सामाजिक राजकारणाला सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना घेऊन त्यांनी जिल्हा, राज्य आणि देश पातळीवरील आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे निखाते यांनी एन एस यू आय च्या राष्ट्रीय कार्यकारणी पर्यंत त्यांनी मजल मारली होती. दरम्यानच्या काळात डॉ दिनेश निखाते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षाने त्यांना जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्याची संधी दिली होती.
डॉ.निखाते यांच्या सौभाग्यवती शीला निखाते यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकल्यानंतर नांदेड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती पदाची धुरा ही त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या पार पाडली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ.निखाते यांच्या सभापती पदाचा कार्यकाळ महत्वपूर्ण आणि संस्मरणीय असा राहिला आहे. आंबेडकरी चळवळीतील हुशार, मुत्सद्दी आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून डॉ.दिनेश निखाते यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या सामाजिक राजकारणाच्या कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर जिल्हा कार्याध्यक्ष पदाची धुरा सोपवली आहे. नांदेड मध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते काँग्रेसला सोडून गेल्यानंतर काँग्रेस पक्षाची मोठी पडझड सुरू असताना डॉ. निखाते मात्र काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहिले.
त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केली. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये एकनिष्ठपणे काम करणाऱ्या डॉ.दिनेश निखाते यांची आंबेडकरी चळवळीतील असलेली प्रतिमा, सर्व समाज घटका सोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध, राजकारणातील अनुभव आणि वरिष्ठांशी असलेले स्नेहपूर्वक संबंध यामुळे देगलूर विधानसभा मतदारसंघात त्यांना उमेदवारी मिळाल्यास निश्चितपणे येथे काँग्रेस महाविकास आघाडीचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. याच अनुषंगाने डॉ.निखाते यांनी मुंबई येथे पक्ष कार्यालयात जाऊन आपल्याला देगलूर – बिलोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी करणारा अर्ज सादर केला आहे.