नायगावच्या ठाणेदार अजित कुंभार यांची तेवीसाव्या दिवशी बदली

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजीत कुंभार यांची २३ व्या दिवशी भोकर बदली करण्यात आली असून भोकरचे संजय मारकड हे नायगाव पोलीस ठाण्याचे कारभारी असतील. तडकाफडकी झालेल्या या खांदेपालटात राजकारण असल्याचे बोलल्या जात आहे. भोकर येथे अकार्यक्षम ठरलेल्या मारकड यांना नायगाव येथे पाठवण्यात आले आहे.
नायगाव पोलीस ठाणे मागच्या दोन वर्षांपासून प्रयोगशाळा झाली असून एक तर ईथे चांगले अधिकारी यायला तयार नाहीत. आले तर त्यांची पळवापळवी होत आहे. २० दिवसापूर्वी नायगाव पोलीस ठाण्याचे मुंढे यांची देगलूर येथे बदली करण्यात आल्यानंतर सुजित कुंभार हा नवीन पोलीस निरीक्षक दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी नायगाव ठाण्यात रूजू झाले. कुंभार स्थिरस्थावर होत असतांनाच त्यांची भोकरला बदली करण्यात आली. आणि त्यांना तातडीने भोकरचा पदभार घेण्याचे आदेश मिळाल्याने ते गुरुवारी सायंकाळी भोकर पोलीस ठाण्यात रूजू झाले.
कुंभार हे भोकरले गेले असून भोकरचे संजय मारकड यांना नायगाव ठाणे बहाल करण्यात आले आहे. पण ते गुरुवारी येथे रूजू झाले नाहीत. मारकड हे ८-९ महिण्यापुर्वीच भोकरला आले होते. पण ते एवढ्या मोठ्या ठाण्याचा कारभार सांभाळण्यात अकार्यक्षम ठरल्याने राजकीय नेत्यांची नाराजी वाढली होती. आता तर विधानसभा निवडणूका असल्याने भोकर ठाण्याला एका सक्षम अधिकाऱ्याची गरज असल्याने हे खांदेपालट करण्यात आले आहे असे बोलल्या जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेते आपापल्या सोईचे अधिकारी पळवत असल्याचे दिसून येत असून. नको असलेले अधिकारी इतर तालुक्यात पाठवून देत आहेत. या खांदेपालटात नायगाव येथे पाठवण्यात आलेल्या मारकड यांच्याबाबत भोकर वासीयांचा अनुभव चांगला नसून त्यांच्यावर अकार्यक्षमतेचा शिक्का बसलेला आहे.