टँकरमधून गांजाची तस्करी… उदगीर पोलिसांनी टँकरसह 76 लाखाचा पकडला गांजा

New Bharat Times नेटवर्क
उदगीर : उदगीर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार शोध मोहीम राबवण्यात आली त्यात एका कारमध्ये दोन किलो गांजासह दोन आरोपींना दि. 2 आक्टोबर रोजी पकडण्यात आले. पकडलेल्या आरोपीकडून सखोल चौकशी केली असता चक्क टँकरमधून गांजाची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार हाकनकवाडी शिवारातील निर्जनस्थळी उभ करण्यात आलेल्या टँकरमध्ये 14 पोत्यामध्ये भरलेला 300 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. टँकर व गांजासह एक कोटी 9 लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याची माहिती ग्रामीण पोलीसांना मिळाली. त्यामुळे ग्रामीण पोलीस सतर्क होते त्यातच दि. 2 आक्टोबर रोजी दोन किलो गांजासह एक कार व दोन आरोपी पोलीसांच्या तावडीत सापडले. अमोल ज्ञानोबा गोरे रा. वडवळ नागनाथ जि. लातुर तसेच एक महिला आरोपी यांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पोलीसी खाक्या दाखवून अधिकची चौकशी केली असता आरोपींनी दिलेल्या माहितीमुळे पोलीसही चक्रावून गेले.
जप्त करण्यात आलेल्या दोन किलो गांजाचे एक पॉकेट हे सॅम्पल पॉकेट होते लातुर, नांदेड, नाशिक येथील गांजा विकणा-या लोकांना सॅम्पल दाखवण्यासाठी त्याचा उपयोग करत होते अशीही माहिती आरोपींनी दिली आणि तेलाच्या टँकरमधून गांजाची तस्करी करण्यात येते अशी माहिती दिली.
मराठवाड्यात गांजा विक्री करण्यासाठी उदगीर तालुक्यात एका टँकरमधून 300 किलो गांजा आला असून. गांजाने भरलेले टँकर हाकनकवाडी शिवारातील निर्जनस्थळी उभ करण्यात आले असल्याचे सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार उदगीर ग्रामीण पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि हकनकवाडी गाठली असता. शाळेच्या पाठीमागे निर्जनस्थळी एम.एच.४६. ए.आर.०६५९ या क्रमांकाचा टँकर दिसून आला. पंचासमक्ष नमुद टँकरची पाहणी केली असता त्यामध्ये अंमली पदार्थ गांजा (शेंडे, फुले, पाने, बिया मिश्रीत) असलेले एकूण चौदा पोते वजन 300 किलो असलेला गांजा किंमत अंदाजे 76 लाख व एक लाल रंगाचे टँकर क्रमांक किंमत अंदाजे 32 लाख किंमतीचे टँकर मिळून आले. पंचासमक्ष नमुद अंमली पदार्थ गांजा व टँकर जप्त करण्यात आले.
संशय येवू नये यासाठी विशाखापट्टणम येथून देगलूर मार्गे उदगीर तालुक्यात टँकरमधून गांजा आणण्यात आला. टँकरचा चालक अमोल गोरे याच्या सोबत सदर गुन्हयामध्ये लहू आलुरे, सचिन आलुरे, कैलास बेंडके सर्व रा.वडवळ नागनाथ ता.चाकुर जि.लातुर यांना अटक करण्यात आली आहे.