नायगाव मतदारसंघात महायुती भाकरी फिरवणार

प्रकाश महिपाळे
नायगाव : भाजप आमदार राजेश पवार यांच्या एककलमी कार्यक्रमामुळे नायगाव विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यात मोठ्या प्रमाणात बेबनाव वाढला आहे. बेबनावाचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारास बसल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यात कमालीची प्रचंड नाराजी पसरली आहे. आमदारामुळे नायगावचे गणित बिघडणार असल्याने पक्षस्तरावरही भ्रमनिरास झाला आहे. या नाराजीचा फटका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला बसू नये यासाठी राज्यस्तरीय नेते मतदारसंघात भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
नांदेड लोकसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला नायगाव विधानसभा मतदारसंघात २० हजाराच्या वर मताधिक्य मिळाले होते तर आ.राजेश पवार यांना ५५ हजाराचे मताधिक्य मिळाले. वसंतराव चव्हाण १६ वर्षे आमदार राहिल्यानंतर मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला आणि राजेश पवार आमदार झाले. पण आजपर्यंत त्यांना भाजपमधील जुन्या लोकांशी जुळवून घेता आले नाही
तर दुसरीकडे त्यांची जनतेशीही नाळ जुळली नाही. त्याचबरोबर पक्षातील वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी यांचे सोबतचे सख्य संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. आमदाराच्या एक कलमी कार्यक्रमामुळे भाजपांतर्गत मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरु आहे. याच धुसफूसीचा आणि आमदाराच्या विरोधातील नाराजीचा फटका २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला बसला.
माजी आमदार राम पाटील रातोळीकर हे रातोळी येथीलच असल्याने त्यांचेही तालुक्यात चांगलेच प्राबल्य आहे. त्याचबरोबर बालाजी बच्चेवार हे दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहीलेले आहेत यांचा नायगाव व बरबडा भागात चांगला जनसंपर्क राहीलेला आहे. शिवराज पाटील होटाळकर हे तर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राहीलेले आहेत. श्रावण पाटील भिलवंडे हे पंचायत समितीचे सभापती होते त्यामुळे वरील सर्व जुन्या जाणत्यांच्या शब्दाला नायगाव तालुक्यात किमत आहे असे असतांनाही आ.पवारांच्या विरोधातील नाराजीचा फटका चिखलीकरांना बसला आहे.
महायुतीच्या ताकतीच्या नेत्याला आ.पवार यांच्या हेकेखोर वागण्याचा फटका बसल्यानंतर काहींनी मतदारसंघातील वस्तुस्थिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यापर्यत पोहचवली आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत ५५ हजाराचे मताधिक्य मिळवणाऱ्या आ. पवारांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ५ हजाराचेही मताधिक्य महायुतीला मिळवून देतो आले नाही. त्यामुळे पक्षातच आमदाराबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी वाढली आहे. विधानसभा निवडणुकीला एक ते दिड महिण्याचा कालावधी असला तरी आ.राजेश पवार एकाही भाजपच्या पदाधिकाऱ्याशी संवाद किंवा संपर्क साधला नाही.
त्यामुळे त्यांना पुन्हा संधी नको यासाठी पक्षातील एक गट सक्रीय झाला असून कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार न केल्यास फटका बसू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नायगाव विधानसभा मतदारसंघात भाजप पक्षश्रेष्ठी उमेदवारी देताना निश्चितच विचार करेल अशी अपेक्षा जुन्या व निष्ठावंतांना वाटत आहे. जर उमेदवारी लादल्यास पक्षांतर्गत धुसफूसीचा स्फोट होवून २०२४ मध्ये मोठा चमत्कार घडू शकतो.
आमदार झाल्यानंतर राजेश पवार यांनी भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांशी तर सोडाच एकाही कार्यकर्त्याशी जुळवून घेतले नाही. कोणत्याही कार्यक्रमात इतर पदाधिकाऱ्यांना स्थानच नसते. ते स्वतः व त्यांची पत्नी एवढेच सिमित कार्यक्षेत्र झाले आहे त्यामुळे कमालीची नाराजी वाढली आहे.
आ.राजेश पवार हे मतदासंघातील निष्ठावंत आणि जुन्या जाणत्यांना सोडून महिला जिल्हाध्यक्ष म्हणून पत्नीची वर्णी लावून घेतली. नायगाव तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केले. उमरी ग्रामीण रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीवरही नियुक्ती करण्यात आली याबद्दलही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यात असंतोष आहे.
आ.राजेश पवाराच्या विरोधी गटात असलेले भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवराज पा.होटाळकर यांनी मागच्या काही दिवसापासून नायगाव विधानसभा मतदारसंघात मोर्चे बांधणी करत असल्याने उमेदवारीच्या स्पर्धेत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर त्यांनी काही दिवसापूर्वी सहविचार सभा घेवून आपली भुमिका जाहीर केली आहे.