हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत डॉ.मिनल खतगावकर यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री भास्करराव खतगावकर यांच्या स्नुषा डॉ.मिनल निरंजन खतगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी हजारो जनसामदयांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यांचे शक्ती प्रदर्शन तर लक्षवेधी ठरलेच पण झालेल्या जाहीर सभेतील भाषणाचा दर्जाही सुसंस्कृतपणाची जाणीव करुन देणारी ठरली आहे.

नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी ता. २२ ते २९ दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या दरम्यान ७० इच्छुकांनी १३३ अर्ज घेतले होते. यातील ३५ उमेदवारांनी ४८ अर्ज ता.२९ पर्यंत दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी दाखल करतांना अनेक उमेदवारांनी गर्दी जमवण्याबरोरच आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या डॉ. मिनल खतगावकर तर भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी प्रचंड गर्दी जमवून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर काल ता. २८ रोजी वंचित बहूजन आघाडीच्या वतीने डॉ.माधव विभूते तर मनोज जरांगे यांच्या आदेशानुसार शिवराज होटाळकर यांच्यासहडॉ. दत्ता मोरे, भगवानराव मनुरकर, माधव ताटे, माधव वडजे यांनी तर सुचिता सुरेश जोगदंड, प्रतिक्षा भगवान मनुरकर, पद्मावती भगवान मनुरकर, मोहम्मद रिझवान, गजानन चव्हाण, मोतीराम कुह्राडे अदिंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस व भाजपच्या जाहीर सभा झाल्या. भाजपच्या सभेला खा.अशोकराव चव्हाण यांनी हजेरी लावली. चव्हाण यांच्यासह आ.राजेश पवार व पुनम पवार यांनी विरोधकावर जोरदार टिकास्त्र सोडले तर पुनम पवार यांनी भास्करराव खतगावकर व शिवराज होटाळकर यांची पोलखोल करत चांगलाच समाचार घेतला. दुसरीकडे डॉ.मिनल खतगावकर यांनी मनोगत व्यक्त करतांना अतिशय सौम्य भाषेत विकासाच्या मुद्यावर संभाषण करतांना भाजपवर बोचऱ्या शब्दात टिका केली.