नायगाव मतदार संघात तिरंगी लढतीत काँग्रेसचे पारडे जड
प्रकाश महिपाळे
नायगाव : उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकून २६ पैकी १६ उमेदवारांनी शेवटच्या दिवसापार्यंत माघार घेतली असल्याने काँग्रेसच्या डॉ. मिनल खतगावकर, वंचितचे डॉ. माधव विभूते व भाजपचे राजेश पवार यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. मात्र विधानसभेच्या मैदानातून शिवराज होटाळकर यांच्यासह गोरठेकर बंधूनी माघार घेतली असल्याने या लढतीत काँग्रेसचे पारडे जड झाले आहे.
नायगाव विधानसभा निवडणुकीसाठी ३५ उमेदवारांनी ४८ अर्ज दाखल केले होते. या उमेदवारी अर्ज छाणणीत रासपच्या एका उमेदवारासह ९ अर्ज अवैध ठरले होते. त्यामुळे २६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. अर्ज माघारीच्या पहील्या दिवशी २ तर शेवटच्या दिवशी १४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरिष गोरठेकर व कैलास गोरठेकर यांनी व मनोज जरांगे यांच्या वतीने शिवराज होटाळकर यांनी उमेदवारी दाखल केली होती.
गोरठेकर व होटाळकर यांच्यामुळे निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला होता. गोरठेकर अपक्ष व होटाळकर जरांगे यांच्या कडून निवडणूक लढवतील अशी चर्चा होत होती पण सोमवारी सकाळी गोरठेकर बंधूंनी तर दुपारच्या नंतर होटाळकरांनी आपले अर्ज मागे घेतले. या दोन दिग्गजांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या डॉ. मिनल खातगावकर, वंचितचे डॉ. माधव विभूते व भाजपचे राजेश पवार प्रमुख उमेदवारासह दहा विधानसभेच्या आखाड्यात राहीले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिरिष गोरठेकर व कैलास गोरठेकर हे अपक्ष आणि मनोज जरांगे यांच्या वतीने शिवराज होटाळकर हे मैदानात राहीले असते तर याचा फटका काँग्रेसचे उमेदवार डॉ. मिनल खतगावकर यांना बसला असता. परंतु आता तिरंगी लढत होणार असल्याने आणि वंचित बहूजन आघाडीचा उमेदवार हा लिंगायत समाजाचा असून यांच्या माध्यमातून भाजपच्या मताचे विभाजन होवू शकते. गोरठेकर आणि होटाळकरांच्या माघारीमुळे मतांचा प्रवाह बदलण्याची शक्यता असल्याने या तिरंगी लढतीत आजच्या परिस्थितीत मात्र काँग्रेसचे पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे.
मैदानात असलेले उमेदवार…
विधानसभेच्या आखाड्यात १० उमेदवार असले तरी डॉ. मिनल खतगावकर, डॉ. माधव विभूते आणि राजेश पवार यांच्यातच तिरंगी सामना होणार आहे. तर अर्चना विठ्ठल पाटील, गजानन शंकरराव चव्हाण ( प्रहार जनशक्ती), मारोती लचमन्ना देगलूरकर (लोकराज्य पार्टी), गंगाधर दिगांबर कोतेवार अपक्ष, भगवान मनुरकर अपक्ष, मुकुंदराव बेलकर अपक्ष, शिवाजी पांचाळ अपक्ष अदि उमेदवार मैदानात आहेत.
अर्ज मागे घेतलेले उमेदवार…. शेवटच्या दिवसापार्यंत शिवराज होटाळकर, शिरिष व कैलास गोरठेकर, गंगाधर गायकवाड, मोहम्मद रिझवान, माधव गणपतराव वडजे, दत्ता यशवंतराव मोरे, प्रभावती भगवान मनुरकर, प्रतिक्षा भगवान मनुरकर, माधवराव ताटे, पुनम पवार, चंद्रकांत आनंदा फुगारे, सुरेखा माधव विभूते, शंकर पोशट्टी शामंते, आकाश रेड्डी सतपलावार.