सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी : पोलीसी अत्याचाराच्या निषेधार्थ नायगाव बंद

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : परभणी घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्यात शहीद झालेले सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला. पोलीसी अत्याचाराच्या विरोधात सोमवारी नायगाव बंद पुकारण्यात आला. व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठान बंद ठेवून निषेध नोंदवला.
परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करुन विटंबना केल्यामुळे आंबेडकरी जनतेने रस्त्यावर उतरून घडलेल्या घटनेचा निषेध केला आंदोलने झाली.

यावेळी परभणी पोलिसांनी आंदोलन कर्त्यावर अमानुषपणे लाठीहल्ला केला. यात परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी या आंदोलकाचा पोलीसांच्या लाठीहल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे आंबेडकरी जनता संतप्त झाली असून. पोलीसी अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी बंदची हाक देण्यात आली होती.

सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करुन त्यांच्यावर अट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात यावा व मयताच्या वारसांना अर्थिक मदत करावी अशी मागणीही करण्यात आली असून असे निवेदन नायगाव पोलिसांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनावर प्रविण भालेराव, प्रकाश कामळजकर, कपिल डुमने, साईनाथ देवकांबळे व माधव नायगावकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.