सोयाबीन खरेदी केंद्रांवरील अडचणींमुळे शेतकरी संकटात
मोरे मनोहर
किनाळा :- देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झालेले असताना या संकटातून सावरण्यासाठी शेतकरी वर्ग सोयाबीन पिकाला योग्य भाव मिळावा, याकडे आशेने डोळे लावून बसला आहे. मात्र शासनाने नाफेडच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देखील मतदारसंघात मोजकीच खरेदी केंद्रे कार्यरत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शासनाने सुरू केलेल्या सोयाबीन खरेदी केंद्रांवर सोयाबीन मालाला डागी माल अथवा जास्त ओलावा असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या सोयाबीन रिजेक्ट करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने ठरवलेल्या १२-१२.५ टक्के ओलावा मर्यादेच्या निकषांवर माल ग्राह्य धरला जातो; परंतु १०-११ टक्के ओलावा असलेला मालही खरेदी न करता रिजेक्ट केला जात आहे.
यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन शासनाने तातडीने १४ टक्के ओलावा निकष मान्य करून सोयाबीन खरेदी केंद्रांना निर्देश द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या विषयावर शासनाने त्वरित कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी देगलूर विधानसभा मतदारसंघातील आ.जितेश अंतापूरकर यांनी विधानसभेत केले.