गौण खनिज माफीयाला महसूलचा दणका : अवैध मातीची ओव्हरलोड वाहतूक करणारा हायवा महसूलच्या पथकाने पकडला
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : अवैध मातीची ओव्हरलोड वाहतूक करतांना महसूल विभागाच्या भरारी पथकाने तालुक्यातील बळेगाव येथे दि.१३ रोजी हायवा पकडला आहे. पुढील कारवाईसाठी हायवा तहसील कार्यालयात लावण्यात आला आहे. मात्र सदरचे वाहण सोडण्यासाठी राजकीय वशीलेबाजी तर सुरुच आहे पण एक वरिष्ठ अधिकारीही दबाव टाकत असल्याचे समजले आहे.
नायगाव तालुक्यात मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम, रेती व मातीची वाहतूक करण्यात येत होती. माफीयांनी महसूल विभागाला अंधारात ठेवून हा गोरखधंदा करत असल्याने बिलोलीचे उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सौ. धम्मप्रिया गायकवाड यांनी या अवैध गौण खनिजाच्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी भरारी पथकाची स्थापना केली होती.
महसूलच्या भरारी पथकातील मंडळ अधिकारी सचिन आरु, आर के पवार व तलाठी पांडुरंग हाके, पवन कदम, गोविंद काळे, कार्लेकर व शुभम पाटील अदिजन कुंटूर परिसरात गस्तीवर असतांना बळेगाव जवळ हायवातून ओव्हरलोड मातीची वाहतूक होत असतांना दिसून आले. त्यामुळे या पथकाने मातीने भरलेली हायवा क्रमांक एम एच 14, एल एल 3984 ला महसूलच्या पथकाने थांबवले व माती घेवून कुठे चालला आहेस अशी विचारणा केली असता उमरी ते वाजेगाव जात असल्याचे सांगितले. सदरच्या माती वाहतुकीचा वाहतूक परवाना मागितला असता चालकाने परवाना नाही पण उमरी तहसीलदारांचे आदेश दाखविले.
महसूल विभागाने दिलेल्या परवान्याऐवजी आदेश घेवून मातीची अवैध वाहतूक करत असल्याने सदरचा हायवा महसूलच्या भरारी पथकाने पुढील कारवाईसाठी नायगाव तहसील कार्यालयात लावला आसून पंचनामा सादर केला आहे. सदरचा हायवा हा एका माफीयाचा असून तो चोरीच्या मार्गानेच अवैध वाहतूक करुन शासनाला चुना लावण्याचे काम करतो. नेमक माफीयाचाच हायवा महसूलच्या पथकाला सापडला. त्यामुळे त्या माफीयाने हायवा सोडवण्यासाठी बरीच राजकीय वशिलेबाजी केली पण काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे त्याने एका वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
नायगाव तालुक्यातील मेळगाव येथे कुंभार समाजाची कुर्णापल्ले हे कुटुंब असून त्यांच्या नावावर कधी उमरी तर कधी नायगाव तालुक्यातून माती उत्खननाची परवानगी वीटभट्यासाठी विक्री करण्यात येते. यावेळी दत्ता कुर्णापल्ले यांच्या नावाने उमरी तालुक्यातील महाटी येथून माती उत्खननाची परवानगी घेवून वाजेगावला विट भट्टीसाठी विक्री करण्यात येत असल्याचे बिंग फुटले आहे.