ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह : 20 ते 26 जानेवारी कालावधीत सप्ताह

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत व शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्यावेळी राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये येत्या 20 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आली आहे.

या दोन्ही परीक्षांना राज्यातून सुमारे 31 लाख विद्यार्थी प्रविष्ट होणार असून सदर परीक्षेत विविध मार्गांनी होणाऱ्या गैरप्रकारांला आळा बसावा यासाठी राज्यातील नऊ विभागीयमंडळे आपल्या स्तरावर विविध उपाययोजना व उपक्रम राबवित असतात. त्याअनुषंगाने डिसेंबर 2024 मध्ये राज्य मंडळाच्या सूचनेनुसार सर्व विभागीय मंडळांनी आपल्या अखत्यारीतील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सभा आयोजित करून गैरमार्ग विरूद्ध लढा तसेच परीक्षेच्या संदर्भात सर्व सूचना देवून उद्बोधन केले आहे.

या सप्ताहात परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.

कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करणे तसेच केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्ती यांच्या नियुक्ती संदर्भात राज्यातील सर्व विभागीय मंडळे, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांना कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत, अशी माहिती शिक्षण राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहात पुढीलप्रमाणे कार्यवाही होणार आहे.

सोमवार 20 जानेवारी रोजी स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा विकास व व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक व मध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य, शिक्षक यांना संयुक्त सभेमध्ये कॉपीमुक्त अभियानाची शाळा पातळीवर अंमलबजावणी करण्याबाबत प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी माहिती दिली जाणार आहे.

मंगळवार 21 जानेवारी रोजी कॉपीमुक्त अभियानाची शपथ सर्व शाळा-कनिष्ठ महाविद्यालयामध्ये परिपाठाचे वेळी घेण्यात येईल.

बुधवार 22 जानेवारीला शाळा स्तरावर मंडळ शिक्षासूचीचे वाचन करणे, मंडळाच्या उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असलेल्या सूचना व प्रवेश पत्रावरील (हॉल तिकीट) सूचनांचे वाचन करणे. गैरमार्ग केल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देणे.

गुरूवार 23 जानेवारी : परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा आहार व आरोग्याची काळजी याबाबत तज्ज्ञांमार्फत शाळा-कनिष्ठ महाविद्यालयमध्ये पालक व विद्यार्थ्यांना उद्बोधन करण्यात येणार आहे.

शुक्रवार 24 जानेवारी रोजी परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासाची तयारी, परीक्षा तणावमुक्त वातावरणात कशी देता येईल, उत्तरपत्रिका कशा प्रकारे लिहाव्यात याबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाईल. तसेच राज्य मंडळामार्फत तयार केलेली चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखविल्या जातील.

शनिवार 25 जानेवारी रोजी कॉपीमुक्त अभियानाच्या जागृतीसाठी कॉपीमुक्ती घोषवाक्यासह शाळा परिसरात जनजागृती फेरी काढली जाणार आहे.

रविवार 26 जानेवारी रोजी ग्रामसभा बैठकीमध्ये मुख्याध्यापक-शिक्षक कॉपीमुक्त अभियानासंदर्भात माहिती देतील व याबाबत जनजागृती करून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker