निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य संधी देणार : स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी खा.रवींद्र चव्हाण यांनी फुंकले रणशिंग
प्रकाश महिपाळे
नायगाव : काँग्रेस पक्षाला अनेकांनी संपवण्याचा प्रयत्न केला पण काँग्रेस काही संपली नाही. कारण काँग्रेस पक्ष तळागाळातील कार्यकर्त्याच्या बळावर टिकून आहे. नेते आले आणि गेले तरी कार्यकर्ते मात्र आजही टिकून आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निष्ठावंतांनाच संधी देवून जिल्ह्यावर काँग्रेसचा झेंडा फडकवून दाखवू असे प्रतिपादन खा. रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केले.
लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा खासदार निवडून आला तरी विधानसभेला मात्र मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने जिल्ह्यात काँग्रेस नेत्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी अजितपवार गटाने पक्ष विस्तारासाठी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गळाला लावण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत.
त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला चांगलीच गळती लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांची विस्तारित बैठक नायगाव येथे दि. 19 जानेवारी रोजी घेण्यात आली. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत मंथन करण्यात आले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ.हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर होते. पुढे बोलताना खा.चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात संघटन बांधणीवर भर दिला जाणार असून तळागाळातील कार्यकर्त्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना न्याय व संधी देण्याचा वेगळा पॅटर्न निर्माण केला जाणार आहे.
अध्यक्षीय समारोपात हाणमंतराव पाटील म्हणाले, स्व.खा.वसंतराव चव्हाण यांच्या खंबीर नेतृत्वामुळे मी पक्ष निष्ठा जपली आणि मी सर्वधर्म समभावाचा पाईक असल्याने जातीयवादी पक्ष कधीच स्वीकारणार नाही. स्व.वसंतराव चव्हाण यांनी अडचणीच्या काळात जिल्हातील काँग्रेस पक्ष सांभाळला, याची नोंद केंद्रीय नेतृत्वाने घेतली असून ही तमाम नांदेडकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. नांदेडचे राजकीय वजन दिल्ली दरबारी वाढले आहे. यापूढे हा पक्ष कानात बोलणार्या कार्यकर्त्यांचा राहणार नाही, तर प्रत्यक्ष बुथस्तरावर, गावपातळीवर ज्यांनी पक्ष वाढविला, त्यांचाच हा राहणार आहे आणि तेच उतराधिकारी राहतील, असा त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला.
या प्रसंगी प्रा. यशपाल भिंगे यांनीही मनोगत व्यक्त करताना पक्षाची कार्यपध्दती बदलून ओबीसी समाजाला भविष्यात पक्षपातळीवर मानाचे स्थान द्यावे लागेल, गद्दारांना बाहेरचा रस्ता दाखवून निष्ठावंताचा आदर करावा, हा पक्ष नव्याने नांदेड जिल्ह्यात नक्कीच उभारी घेईल, पक्षाने मला दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडीन असे आश्वासन दिले.
या बैठकीत माजी आ.माधवराव पाटील जवळगांवकर, राहूल भैया हंबर्डे, जाकेर चाऊस, अॅड सुरेंद्र घोडजकर, निवृत्ती कांबळे, एकनाथ मोरे, रंगनाथ गुरुजी भूजबळ, संजय भोसीकर, यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली, या बैठकीसाठी अब्दुल सत्तार, शमीम भाई, मसुद खान, आनंदराव गुंडूले, अॅड निलेश पावडे, सुभाष पा.किन्हाळकर, यांच्यासह १४ तालुक्यांचे तालुकाध्यक्ष, जिल्हा आघाडीचे सर्व जिल्हाध्यक्ष व कार्यकारी अध्यक्षासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.