कुंडलवाडी सोसायटीच्या शेतकरी एपीएल कार्ड धारकांना ६ लाख ८२ हजार ६५० रुपये मंजूर
◆ सोसायटी चेअरमन सुनील बेजगमवार यांच्या पाठपुराव्याला यश
कुंडलवाडी :- येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत असलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांतर्गत असलेल्या शेतकरी एपीएल डीबीटी फार्मर योजनेतील ५०५ लाभार्थ्यांना शासनाकडून धान्य देण्याऐवजी प्रति लाभार्थी १५० रुपये देण्यात येतात.गत दोन वर्षापासून हे पैसे रखडले होते.
सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे याबाबत पत्रव्यवहार करून ही रक्कम देण्याची मागणी केली होती. या मागणीस अखेर यश आले असून सोसायटीच्या ५०५ लाभार्थ्यांना १ एप्रिल २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत असे ९ महिन्याचे ६ लाख ८२ हजार ६५० रुपये मंजूर करण्यात आले असून सदरील रक्कम ५०५ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती बिलोली तालुका पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार यांनी पुरवठा विभागाकडे पाठपुरावा करून शेतकरी एपीएल डीबीटी फार्मर योजनेतील लाभार्थ्यांना रक्कम मिळवून दिल्याने लाभार्थी समाधान व्यक्त करीत आहेत.