अवैध धंदे बंद करण्याबरोबरच कुंडलवाडी पोलीसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचे नव्या ठाणेदारांसमोर आव्हान
◆कुंडलवाडी पोलीस ठाण्यात सपोनि ज्ञानेश्वर शिंदे रूजु
कुंडलवाडी :- येथील पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांचे निलंबन करण्यात आल्याने त्यांच्या जागी बिलोली पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांची पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात नियुक्ती केली आहे.
गत दीड वर्षात दोनदा लाचखोरीचे प्रकरण कुंडलवाडी पोलीस ठाण्यात घडल्यामुळे जनमानसात कुंडलवाडी पोलीस ठाण्याची प्रतिमा मलीन झाली आहे. शहरातील अवैध धंदे पूर्णतः बंद करून पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचे आव्हान नूतन सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्यापुढे आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलात कुंडलवाडी पोलीस ठाणे नेहमीच चर्चेत राहिले आहे.बिलोली धर्माबाद व कुंडलवाडी ही ठाणे तेलंगणा सीमावर्ती भागात असल्याने तसेच या भागात मोठ्या प्रमाणात वाळू घाट असल्याने ही ठाणे मिळण्यासाठी नेहमीच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा राहिली आहे. कुंडलवाडी पोलीस ठाणे मिळवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी आपले राजकीय वजनही अनेकदा वापरून सहायक पोलीस निरीक्षकाची खुर्ची मिळविल्याचे यापूर्वी पाहायला मिळाले.
शहर व परिसरात अवैध गुटखा, मटका, अवैध वाळू वाहतूकअवैध जुगार, अवैध देशी दारू विक्री यासह अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यापूर्वीच्या अधिकाऱ्यांच्या काळात अवैध धंदे व्यावसायिक व गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या इशारावरच ठाण्याचा कारभार चालू होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व पोलीस यांच्यात दुरावा निर्माण झाला.
जनतेच्या रक्षणासाठी आलेल्या नूतन पोलीस अधिकाऱ्यांचा जंगी सत्कार अवैध धंदे व्यावसायिकांकडून नेहमीच कुंडलवाडी पोलीस ठाण्यात झाला आहे. आपले धंदे व्यवस्थित चालावे यासाठी अवैध धंदे व्यावसायिक नेहमीच हा खटाटोप करतात. नूतन सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी हार, तुरे सत्कार स्वीकारण्याचा पायंडा मोडतील का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कुंडलवाडी पोलीस ठाणे हे सीमावर्ती भागात असल्याने तसेच वाळूपट्ट्याचा भाग असल्याने सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून कुंडलवाडी पोलीस ठाण्याकडे पाहिले जाते. यातच वाळू ठेकेदाराकडून कायदेशीर परवानगी असतानाही लाच मागितल्या प्रकरणी तीन दिवसांपूर्वी एपीआय भागवत नागरगोजे व पीएसआय नारायण शिंदे हे लाचेच्या जाळ्यात अडकल्यानंतर कुंडलवाडी पोलीस ठाण्याची जनमानसात प्रतिमा मलिन झाली आहे.
नूतन सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे हे अवैध धंदे पूर्णतः बंद करण्याबरोबरच जनमानसात कुंडलवाडी पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारतील काय हे आगामी काळातील त्यांच्या कारभारावरून दिसून येणार आहे.