आरोग्यताज्या बातम्यानांदेड

चिकन, अंडी खाणे शंभर टक्के सुरक्षित नांदेडमध्ये बर्ड फ्लूची लागण नाही

कोणत्याही अफवांना बळी पडू नका पशुसंवर्धन विभागाचे नागरिकांना आवाहन

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : बर्डफ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. उकळलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही. त्यामुळे यासंदर्भात समाज माध्यमांवर फिरणारे संदेश व काही माध्यमातून आलेल्या चुकीच्या बातम्यांना बळी पडू नका. चिकन, अंडी खाणे शंभर टक्के सुरक्षित असल्याचा खुलासा पशुसंवर्धन विभागाने केला आहे.

यासंदर्भात आज एक चित्रफित पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी जारी केली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत या आजारा संदर्भात अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील केवळ किवळा या एका गावामध्ये काही पक्षांमध्ये बर्डफ्लू सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. या ठिकाणी तातडीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्डफ्लूची लागण नाही, असा खुलासा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.राजकुमार पडिले यांनी केला आहे.

किवळा या गावी साधारणता 20 तारखेच्या आसपास एका पशुपालकाच्या कुक्कुट पक्षांमध्ये मृत पक्षी आढळून आल्याने त्याचे नमुने राज्य व राष्ट्रीयस्तरीय प्रयोग शाळेत निदानासाठी पाठविले होते. या प्रयोगशाळेतील बर्डफ्लूसाठीचे नमुने पॉझिटिव्ह दिसून आल्यानंतर या गावामधील 1 किमी परिघाच्या क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केले आहेत. त्यामध्ये साधारणपणे 382 मोठे पक्षी आणि 74 छोटे पक्षी असे एकूण 456 पक्षी नष्ट केले आहेत. त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली आहे.

त्याचबरोबर संसर्ग झालेल्या 1 किमी क्षेत्राबाहेरील बाधित क्षेत्राच्या 10 किमी अंतरापर्यत आपण सर्तकता क्षेत्र घोषित केले आहे. त्या क्षेत्रातील जितके कुक्कुट पक्षी आहेत त्याचे नमुने दर 15 दिवसाला पुढील 3 महिन्यांपर्यंत प्रयोगशाळेकडे पाठवून त्याचे निदान केले जाणार आहे. त्या पक्षांमध्ये जर आपल्याला परत लक्षणे आढळून आली तर त्यावरही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाणार आहे.

साधारपणे बर्डफ्लू हा रोग 2006 पासून राज्यात दिसून आला आहे. तेंव्हापासून एक आदर्श कृती प्रतिसाद धोरण पशुसंवर्धन विभागाने हाती घेतले आहे. याअंतर्गत नियमितपणे आजारी व निरोगी कुक्कुट पक्षाचे नमुने प्रयोग शाळेमध्ये सादर केले जातात. त्यातूनच आपल्याला कुठे जर बर्डफ्लूची लक्षणे दिसून आली तर त्याचे निदान होते. बर्डफ्लू आजार केवळ स्थलांतरण झाले तर पक्षांमध्ये पसरतो. त्यामुळे स्थलांतरण रोखणे त्यावरचा प्रमुख उपाय असतो. जिथे हा रोग आढळून येतो तिथले कुक्कुट पालन 3 महिन्यासाठी थांबविण्यात येते. त्यामुळे या रोगाचा प्रसार निश्चितपणे थांबवता येते.

नागरिकांनी यासंदर्भात निर्धास्त असावे. आपण खात असलेले चिकन, अंडी हे शंभर टक्के सुरक्षित आहेत, याचीही खात्री प्रत्येक नागरिकांनी बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker