नांदेड जिल्हा बँकेवर खासदार रवींद्र चव्हाण बिनविरोध
अंकुशकुमार देगावकर
नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बँकेचे अध्यक्ष तथा माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर आणि आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काही दिवसापूर्वी घेतलेल्या ठरावानुसार मंगळवारी ही निवड जाहीर करण्यात आली.
माजी खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर बँकेच्या संचालकपदाच्या रिक्त जागी खासदार रवींद्र चव्हाण यांची निवड करण्याचा ठराव बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर आणि आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काही दिवसांपूर्वी घेतला होता.
त्यानुसार जिल्हा बँकेच्या सभागृहात मंगळवारी सकाळी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. खासदार रवींद्र चव्हाण यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने या बैठकीत त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून भास्करराव पाटील खतगावकर तर अनुमोदक म्हणून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्वाक्षरी केली. जिल्हा निबंधक (सहकार, नांदेड) अशोक भिलारे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
यावेळी बँकेचे अध्यक्ष भास्कर पाटील खतगावकर, आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, दिनकर दहिफळे, गोविंदराव शिंदे नागेलीकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर, बाबुराव कदम कोंडेकर, राजेश पावडे, रामचंद्र मुसळे, शिवराम लुटे, राजेंद्र केशवे, प्रीतम देशमुख हाणेगावकर,श्याम कदम, विजयाताई शिंदे, सविता मुसळे, संगीता पावडे, यांच्यासह बँकेचे कार्यकारी संचालक अजय कदम यांनी खासदार रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन व स्वागत केले.
सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी-खा. रवींद्र चव्हाण
जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात काम करण्याची मला संधी मिळाली आहे. बँकेच्या प्रगतीसाठी सर्व संचालक मंडळाच्या विश्वासास मी पात्र ठरेन, असा विश्वास व्यक्त करून खासदार रविंद्र चव्हाण यांनी संचालकपदी बिनविरोध निवड केल्याबद्दल उपस्थित सर्व संचालकांचे आभार मानले.