पाणी टंचाई स्थळपाहणी करण्यासाठी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना वेळ मिळेना

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तालुक्यात पाणी टंचाईचे चटके जाणवत असून नागरिकांच्या घशाला कोरड पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींनी विहीर व बोअर अधिग्रहण करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवले आहेत. पंचायत समितीने त्रुटीची दुरुस्ती करुन हे प्रस्ताव तहसील कार्यालयात पाठवले आहेत. मात्र गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांना पाणी टंचाई असलेल्या गावात स्थळ पाहणी करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने जनतेत नाराजीचा सुर उमटला आहे.
उन्हाच्या तिव्रतेने तालुक्यातील जनतेचा पाणी टंचाईने घसा कोरडा पडलेला आहे. दुसरीकडे जलजीवन मिशनची कामेही रखडली आहेत त्यामुळे जनता टंचाईने होरपळल्या जात आहे. पाणी टंचाईच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी लोकप्रतिनिधीसह अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे आपापल्या गावात पाणी टंचाचे चटके जाणवत असल्याने तालुक्यातील खंडगाव, रातोळी तांडा, पळसगाव, दरेगाव, कारला माहेगाव, ईकळीमोर, केदारवडगाव, मुस्तापूर, गडगा, कोलंबी व डोंगरगाव अदि गावातील १६ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले. परंतु पंचायत समितीच्या भोंगळ कारभारामुळे प्राप्त प्रस्तावाची तपासणी न करता तहसील कार्यालयात पाठवण्यात आले होते.
अपूर्ण प्रस्ताव तहसील कार्यालयाने परत पाठवल्यानंतर त्रुटीची दुरुस्ती करुन पुन्हा नव्याने तहसील कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्यात आले. मागच्या पंधरा दिवसापासून हे टंचाईचे प्रस्ताव पंचायत समिती व तहसील कार्यालयात प्रवास करत आहेत. यावर तातडीने निर्णय तर घेतलाच नाही पण त्रुटींची दुरुस्ती होईल तेवढ्या वेळात प्रस्ताव आलेल्या गावात तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी संयुक्त भेटी देवून संभाव्य पाणी टंचाईची स्थळ पाहणी करता आली असती पण तहसीलदार सौ.धम्मप्रिया गायकवाड व गटविकास अधिकारी एल.आर.वाजे यांना टंचाईचे गांभीर्य दिसून येत नाही.
नायगाव तालुक्याला गांभीर्य नसलेले अधिकारी मिळाल्याने जनतेची होरपळ सुरु आहे. दुसरीकडे या भागाचे लोकप्रतिनिधींनाही टंचाईच्या झळा जाणवत नसल्याने ते अधिकाऱ्यांना गोंजारण्याचे काम करत आहेत परिणामी जनतेला मात्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.