कुंचेलीच्या सरपंचपदी गोविंद डाकोरे कायम

प्रकाश महिपाळे
नायगाव : तालुक्यातील कुंचेलीचे सरपंच गोविंद हणमंतराव डाकोरे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी नुसार त्यांच्या कालावधीतील संपूर्ण ग्रामसभा व मासीक सभा घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सरपंच पदावर कायम ठेवले असून बालाजी किसन जाधव व इतर चार जणांनी दाखल केलेला विवाद अर्ज फेटाळून लावला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ग्रामपंचायत कुंचेली ता. नायगाव चे सरपंच गोविंद हणमंतराव डाकोरे यांनी नियमानुसार ग्रामसभा व मासीक सभा घेतल्या नसल्यामुळे त्यांना उर्वरीत कालावधीसाठी सरपंच पदावरुन बडतर्फ करावे असा विवाद अर्ज कुंचेली येथील बालाजी किसन जाधव व इतर चार अश्या पाच जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. सदर प्रकरणात गटविकास अधिकारी, पंचायत समिती नायगाव यांचा अहवाल मागविण्यात आला. व संबंधीताना नोटीसा पाठवून आपआपली बाजु मांडण्याची सधी दिली.
गटविकास अधिकारी नायगाव यांचा ग्रामसभा व मासीक सभेचा अहवाल तसेच वादी व प्रतिवादी यांच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद ऐकुन सरपंचाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ७ नुसार ग्रामसभा व कलम ३६ नुसार मासीक सभा घेतल्याचे निष्पन्न झाल्यामुळे बालाजी किसन जाधव व इतर चार जणांनी दाखल केलेला विवाद अर्ज जिल्हाधिकारी यांनी फेटाळून लावला. सरपंच गोविंद हणमंतराव डाकोरे यांना सरपंच पदावर कायम ठेवले. ग्रामपंचायत कुंचेलीचे सरपंच गोविंद हणमंतराव डाकोरे यांच्या वतीने अॅड.एन.जे.काकडे यांनी काम पाहीले.



