नरसी सोसायटीच्या एका जागेच्या फेर मतमोजणीत भाजप नेते श्रावण भिलवंडे यांनी ‘हारी हुई बाजी’ जिंकली

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : जिल्हा उपनिबंधकाच्या आदेशानुसार नरसी सेवा सहकारी सोसायटीच्या एका जागेची फेर मतमोजणी येथील सहायक निबंधक कार्यालयात गुरुवारी ईन कँमेरा व कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडली. यावेळी भाजप नेते श्रावण भिलवंडे यांच्या गटाचे जनाजी खनपटे २ मताने विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एन.एस. होनराव यांनी जाहीर केले. या एका विजयामुळे सदस्य संख्या ७ झाली असून भिलवंडे यांनी हारी हुई बाजी जिंकली आहे.
संपूर्ण जिल्हात चर्चेची ठरलेली नरसी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक दि. १६ रोजी पार पडली. मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीला ७ जागा तर भाजप नेते श्रावण भिलवंडे यांच्या गटाला ६ जागा मिळाल्या होत्या. मात्र अनुसूचित जाती व भटक्या जमाती गटातून महाविकास आघाडीचे निवडून आलेले पांडुरंग बागडे यांच्या निवडीबद्दल आक्षेप घेण्यात आला या जागेची फेर मतमोजणी घेण्यात यावी असा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे भाजपच्या उमेदवारांने केला होता. पण फेर मतमोजणी करण्यात आली नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाला जिल्हा उपनिबंधकाच्या कोर्टात आव्हान देण्यात आले. यावर दि. १९ मार्च रोजी सुनावणी झाली.
जिल्हा उपनिबंधकांनी दि. २० मार्च रोजी सहायक निबंधक कार्यालय नायगाव येथे फेर मतमोजणी घेण्याचे आदेश दिले आणि त्यासाठी एका प्रतिनीधीचीही नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे गुरुवारी दुपारी १ वाजता येथील सहायक निबंधक कार्यालयात ईन कँमेरा व कडेकोट पोलीस बंदोबस्तात फेर मतमोजणी झाली.
यात जनाजी खनपटे यांना १८७ तर पांडुरंग बागडे यांना १८५ मते मिळाली तर १६ मते बाद झाली. दोन मताने निवडून आलेले बागडे यांचे फेर मतमोजणीत ४ मते कमी झाली तर जनाजी खनपटे यांची चार मते वाढल्याने ते दोन मताने विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी होनराव यांच्या हस्ते खनपटे यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
नरसी सोसायटीच्या १३ जागेपैकी ७ जागा निवडून आल्याने महाविकास आघाडीला काठावरचे बहूमत मिळाल्याने सोसायटीवर ताबा मिळवला. परंतु ६ सदस्य असलेल्या भाजप नेते श्रावण भिलवंडे यांनी मात्र पांडुरंग बागडे यांच्या निवडीला आव्हान तर दिलेच पण फेर मतमोजणीत एक सदस्य निवडून आला. त्यामुळे बाजी पलटली असून श्रावण भिलवंडे यांच्या गटाचे आता ७ सदस्य झाले आहेत. त्यामुळे नरसी सोसायटीवर भिलवंडे यांच्या गटाने ताबा मिळवला आहे.
गुरुवारी झालेल्या मतमोजणीसाठी दोन्ही गटाच्या पराभूत आणि विजयी उमेदवारांना नोटीस देण्यात आली होती. परंतु विजयी उमेदवार पांडुरंग बागडे हे अनुपस्थित होते तर पराभूत उमेदवार जनाजी खनपटे हे उपस्थित होते. मात्र फेर मतमोजणीत जनाजी खनपटे यांना लाँटरी लागली आहे.
नरसी सोसायटीची हायव्होल्टेज निवडणूक झाल्याने अगोदरच तणावाची परिस्थिती होती. त्यातच गुरुवारी एका जागेची फेर मतमोजणी होणार असल्याने वातावरण बिघडणार असल्याची कुणकुण लागल्याने कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेवून राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात केल्याच होत्या पण मतमोजणी कार्यालयात नायगाव व रामतीर्थ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तळ ठोकून बसले होते.