अजित पवारांच्या समोरच आ.चिखलीकराकडून स्वबळाचा इशारा : अशोकराव चव्हाणावरही साधला निशाणा

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने नांदेड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच आ. प्रतापराव चिखलीकर यांनी नाव न घेता अशोकराव चव्हाण यांच्यावर टिकेचे बाण तर सोडलेच पण स्वबळावर लढण्याची खुमखुमी असेल तर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कमी नाही असा स्पष्ट इशारा दिला.
आ.प्रताप पा.चिखलीकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर लोहा कंधार मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची नांदेड जिल्ह्यात घौडदौड सुरु झाली असून अनेक दिग्गज नेते माजी आमदार हे आ.चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून पक्ष प्रवेशाचे भव्य सोहळेही होत आहेत.
रविवारी नरसी येथे माजी मंत्री भास्कराव खतगावकर यांनीही भव्य पक्ष प्रवेश सोहळा घेवून ना.अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आ.चिखलीकरांनी आपल्या चौफेर भाषणात नाव न घेता अशोकराव चव्हाणावर जोरदार टिकेचे बाण सोडले.
ना.अजित पवार व्यासपीठावर उपस्थित असताना आ.चिखलीकरांनी नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकत वाढत चालली आहे त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद व्यक्त तर केलाच पण मी तटकरे साहेबांना सांगितलोय भाजपला हात लावला नाही, त्यांनी जर चुकून जर बोट इकडे केल तर दांडू केल्याशिवाय राहणार नाही असा अस्सल गावरान भाषेत इशारा दिला.
काही लोकांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भुमिका घेतली त्यामुळे मला पत्रकारांनी विचारल आपली भुमिका काय ? आमचे नेते जी भुमिका घेतील ते आम्हाला मान्य असेल. जर कुणाध्ये खुमखुमीच असेल स्वतंत्र लढायची तर नांदेड जिल्ह्याची राष्ट्रवादी कमी नाही असे नाव न घेता चिखलीकरांनी अजित पवारांच्या समोरच ठणकावले.
पोकर्णा यांना अशोकराव उशिरा कळाले…
ओमप्रकाश पोकर्णा व मी अनेक वर्षे एकत्र काम केलोत पण मला ते लवकर कळले पोकर्णा यांना अशोकराव कळायला वेळ लागला. मला लवकर कळल्याने मी २००४ मध्ये आमदार झालो अन्यथा मी जिल्हा परिषद अध्यक्षच्या पुढे गेलो नसतो असेही यावेळी आवर्जून सांगितले.