फडणवीस यांच्या ‘चिप-डिस्क’च्या विखारी वक्तव्यावर विद्यापीठात विद्यार्थी काँग्रेसची निदर्शने

New Bharat Times नेटवर्क
नांदेड : देशभरातील निवडणुकीत मतचोरी झाल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी निवडणूक विभागाच्या काळ्या करण्याचा भांडाफोड केला आहे. यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या “राहुल गांधी यांच्या डोक्यातील चिप गायब आहे आणि त्यांची डिस्क करप्ट झाली आहे” या अवमानकारक विधानाचा नांदेड जिल्हा एनएसयुआय विद्यार्थी काँग्रेस तर्फे तीव्र निषेध करण्यात आला.
निवडणूक विभागाने गेल्या निवडणुकीमध्ये वाढीव मतासाठी जे कारणामे केलेले आहेत ते सबळ पुराव्यानिशी पत्रकारांसमोर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी दाखवून दिले आहे. याला खरतर उत्तर निवडणूक विभागाने द्यायला हवे, पण निवडणूक विभागाच्या कार्यावर ज्या ज्यावेळी आरोप होतात, त्या त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते निवडणूक विभागाचे प्रवक्ते बनवून उत्तर द्यायला पुढे येतात. यावेळीही निवडणूक विभागाने उत्तर देण्याऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस पुढे आले आणि त्यांनी हे विकारी वक्तव्य केले. याचाच अर्थ निवडणूक विभाग भारतीय जनता पक्ष चालवतो आहे, तो आता स्वायत्त राहिला नाही हे यातून सिद्ध होते.
या संदर्भात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याविरोधात प्रचंड संताप व्यक्त करत घोषणाबाजी केली. “देशाच्या लोकशाहीवर भाजप सरकारने वारंवार प्रहार केला असून, काँग्रेस नेतृत्वाचा अवमान आम्ही कदापिही सहन करणार नाही,” असा इशारा एनएसयुआयकडून देण्यात आला.
या आंदोलनात विद्यार्थी काँग्रेसचे सुरज पाटील शिंदे, गोविंद पाटील, अक्षय नळगे, डॉ.आदित्य सोंडारे, आत्रम बुद्धेवाड, विजय पांगरीकर, प्रकाश तारू, जगदीश पावडे, निखिल पाटील यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.



