ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

बिबट्याच्या मृत्यू प्रकरणात तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षकावर गुन्हा दाखल करा

अन्याय प्रतिकार दलाची मागणी ; हिवाळी अधिवेशनात उपोषणास बसणार…

New Bharat Times नेटवर्क

नांदेड :- किनवट तालुक्यातील सारखणी घाटातील जंगलातून जाणाऱ्या महामार्गावर वाहनांच्या धडकेत बिबट्या वाघाचा मृत्यू झाला होता त्यानंतर घटनास्थळावरून वाघाचा मृतदेह गायब झाला. वन्यप्राण्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी सोडून कर्तव्यात कसूर करणारे तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक जी.डी.गिरी व मांडवीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक व वनविभागाच्या वरिष्ठांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांची भेट घेऊन निवेदनातून अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र पर्यावरण बचाव समितीचे अध्यक्ष सिध्दार्थ तलवारे यांनी केली असून याबाबत महाराष्ट्र विधानमंडळ हिवाळी अधिवेशनादरम्यान दि.१३ डिसेंबर पासून बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचा ईशारा त्यांनी दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव भवरे उपस्थित होते.

वाघाच्या संवर्धनासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न होत असून वनपरिक्षेत्राअंतर्गत उन्हाळ्यात जलकुंभ उभारणी व इतर सोयीच्या अभावामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात रस्त्यावर येतात परिणामी त्यांचा अपघात होतो किंवा शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकण्याची भीती असते. मांडवी वनपरिक्षेत्राची जबाबदारी असणारे तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक जी.डी. गिरी व संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून कर्तव्यात कसूर झाली आहे. सारखणी घाटात वन तपासणी नाक्याच्या काही अंतरावर वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला होता.

घटनेनंतर स्थानिक वनप्रेमी नागरिकांनी मोबाईलवरून अधिकाऱ्यांना माहिती कळविली होती परंतु संबंधित अधिकारी तीन तासांनंतर घटनास्थळी आले होते तोपर्यंत बिबट्याचा मृतदेह गायब झाला होता, या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी कोणतीच मोहिम राबविण्यात आली नाही याउलट हे प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न झाल्याने वन्यप्रेमी नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. बिबट्याचे शव कुठे गायब झाले याबाबत अन्याय प्रतिकार दल आणि अन्य संघटनांनी विचारणा केली होती परंतु त्यास अद्याप उत्तर देण्यात आले नाही. नांदेड चे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांचे आपल्या अधिपत्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहिलेले नाही.

त्यामुळे शासन व वन विभागाच्या वरिष्ठांनी यात लक्ष घालावे व बिबट्याचा मृतदेह गायब प्रकरणांत संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सिध्दार्थ तलवारे यांनी निवेदनातून केली असून त्यात याबाबत येत्या १३ डिसेंबर पासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे आमरण उपोषणास बसणार असल्याबाबत कळविले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दखल !
महत्वपूर्ण बाब म्हणजे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत दखल घेतली असून त्यांच्यास्तरावरुन राज्याच्या वनविभागाचे सचिव मिलींद म्हैसकर व नागपूरचे जिल्हाधिकारी यांना याप्रकरणात योग्य त्या कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker