ताज्या बातम्यानांदेडनायगांव

जलसंपदा विभागाने थकबाकी वसुलीसाठी पंपग्रहाला लावले सिल : चार दिवसानंतर नायगाव शहरात पाणी पुरवठा सुरु

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : जलसंपदा विभागाने ३० लाखाच्या थकबाकी साठी नायगाव शहराचा पाणी पुरवठा ( दि. २६) फेब्रुवारीला बंद केला. त्यामुळे ऐन होळीच्या तोंडावर शहरात निर्जळी निर्माण झाल्याने नागरिकांनी नगरपंचायतच्या नावाने शिमगा सुरु केला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नगरपंचायतने शहरात टँकरने पाणी पुरवठा सुरु केला. परंतु जलसंपदा विभागाशी झालेल्या चर्चेनंतर चार दिवसांनी पाणी पुरवठा सुरु करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असला तरी नगरपंचायतच्या बेफिकिरीची चर्चा शहरात होत आहे.

नायगाव नगर पंचायत मागच्या काही महिण्यापासून विविध विकास कामातील अर्थिक अनियमितेमुळे चर्चेत आली आहे. त्याचबरोबर घनकचरा, स्ट्रीट लाईट यातील घोट्याळ्याचीही शहरात दबक्या आवाजात चर्चा होत असताना जलसंपदा विभागाने नायगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंपग्रहाला सिल ठोकल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती घेतली असता तळणी बृ.ल.पा. च्या जलाशयावरून नायगाव पाणी पुरवठा होतो. परंतु नगरपंचायतने अनेक वर्षांपासून पाणी पट्टीच भरली नाही. त्यामुळे ३० लाख थकबाकी झाली होती. पाणी पट्टी भरण्याबाबत जलसंपदा विभागाने अनेकवेळा नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली पण प्रतिसाद मिळाला नाही.

नगरपंचायतला खेटे मारुन वैतागल्या जलसंपदा विभागाच्या सिचन शाखेच्या अधिकाऱ्यांशी दि. २६ फेब्रुवारीला ऐन होळीच्या तोंडावर तळणी जल प्रकल्पात असलेल्या पाणी पुरवठ्याचे पंपग्रह सिल केले. जलसंपदा विभागाची पाणीपट्टी न भरल्यामुळे मोहरबंद (सिल) करण्यात येत आहे असे पत्रात नमूद केले आणि वरील कार्यवाही जलसंपदा विभागाचे आदेश आणि महाराष्ट्र सिंचन कायदा १९७६ नुसार करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

सदर सिल केलेल्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा गैरप्रकार जसे सिल तोडणे, सूचना फाडणे आणि विनापरवानगी अनधिकृत प्रवेश करणे असे आढळून आल्यास भारतीय दंड संहिता कलम १८६, कलम ४४१ महाराष्ट्र सिंचन कायदा १९७६ कलम १९ (अ), २०, १८० अंतर्गत कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशाराही दिला होता.

ऐन होळीच्या तोंडावर पाणी पुरवठा बंद झाल्याने शहरात मोठ्या प्रमाणात चर्चेचा उधान आले. नगरपंचायतच्या नावाने शिमगा होवू लागला त्यामुळे नगरपंचायतने धावपळ करत शहरात तातडीने टँकरने पाणी पुरवठा सुरु केला. ३० ते ४० हजार लोकसंख्या असलेल्या शहरात टँकरने पाणी पोहचत नसल्याने नगरपंचायतची चांगलीच पंचायत होवू लागली होती.

अखेर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन तातडीने २ लाख रुपये भरण्यात आले आणि पुढील पंधरा दिवसात उर्वरित रक्कम भरण्याचे आश्वासन दिल्याने चार दिवसानंतर शहरात पाणी पुरवठा सुरु झाला आहे. पंपग्रहाला सिल ठोकल्यामुळे नायगाव नगरपंचायतची चांगलीच पंचायतही झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker