नायगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अन्नदान

New Bharat Times नेटवर्क
नायगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून नायगाव शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या मंगलदिनी भीम अनुयायांची सेवा घडावी या उदात्त हेतूने मिलिंद बच्चाव, सतिष वाघमारे, प्रकाशभाऊ हनमंते आणि साहेबराव कोपरेकर यांच्या वतीने शहराच्या मुख्य चौकात भव्य अन्नदान (खिचडी वाटप) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन रामतिर्थ पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज नरवाडे यांच्या शुभहस्ते मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता पार पडले.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मंगेश हनवटे, नागोराव डूमणे, विलास बच्चाव, संतोष भालेराव, विनोद भालेराव, नागेश भालके, प्रकाश कामळजकर, प्रल्हाद भालेराव, भीमराव हनमंते आणि सोनू बच्चाव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे भीम शाहीर बाळासाहेब आवाड यांचा कार्यक्रम. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात एकापेक्षा एक सरस भीम गीते सादर करून उपस्थित हजारो भीमसैनिकांना मंत्रमुग्ध केले. “ना भाला, ना बरची, ना घाव पाहिजे, तुझ्या रक्तातला भीम पाहिजे” अशा प्रेरणादायी विचारांनी वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.
नायगाव शहरासह तालुक्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो बंधू-भगिनींची आणि अनुयायांची सेवा घडावी, या भावनेतून आयोजकांनी हा प्रामाणिक प्रयत्न केला. या उपक्रमाचा लाभ हजारो भीम अनुयायांनी घेतला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रकाशभाऊ हनमंते यांनी केले.
”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात पोहचवण्यासाठी आणि अनुयायांच्या सेवेसाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.”



