नायगाव तालुक्यात निकृष्ट शेती अवजारांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक ; ‘छावा’ संघटनेचा तहसीलदारांना इशारा
लोखंड भंगार, किंमत सोन्याची! नायगावच्या शेती अवजार निर्मितीत मोठा घोटाळा?

नायगाव : नायगाव तालुक्यात निकृष्ट दर्जाचे लोखंड वापरून शेती अवजारे तयार केली जात असून, याद्वारे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून निकृष्ट साहित्य जप्त करावे, या मागणीसाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने नायगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, तालुक्यातील काही उत्पादक व व्यावसायिक पंजी, पलटी, रूटर, पेरणी यंत्र यांसारखी कृषी अवजारे तयार करताना अत्यंत हलक्या दर्जाच्या लोखंडाचा वापर करत आहेत. ही अवजारे मजबूत असल्याचे सांगून शेतकऱ्यांना विकली जातात, मात्र अवघ्या काही दिवसांतच ती तुटणे किंवा वाकणे अशा तक्रारी येत आहेत. शेतकरी कर्ज काढून ही महागडी अवजारे खरेदी करतात, मात्र निकृष्ट दर्जामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
प्रमुख मागण्या:
१. तालुक्यात तयार होणाऱ्या शेती अवजारांची कृषी, जीएसटी आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाद्वारे सखोल चौकशी व्हावी.
२. उत्पादकांकडील लोखंड खरेदीची जीएसटी बिले, परवाने व अधिकृत कागदपत्रांची तपासणी करावी.
३. चौकशी पूर्ण होईपर्यंत संशयास्पद उत्पादकांचे साहित्य प्रशासनाने ताब्यात घ्यावे.
४. विनापरवाना व निकृष्ट दर्जाचे साहित्य विक्री करणाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करावी.
शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याची फसवणूक प्रशासन खपवून घेणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल न घेतल्यास शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आ. भा. छावा संघटनेचे नायगाव तालुकाध्यक्ष साईनाथ शिवाजीराव पाटील मोरे यांनी दिला आहे.
या निवेदनावर साईनाथ मोरे (तालुकाध्यक्ष), रजित पाटील नटे मुगावकर (जिल्हाध्यक्ष) व इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



