डिजिटल जनगणनेत ‘तलबीड’ पॅटर्न! १००% स्वगणना पूर्ण करून नायगाव तालुक्यात अव्वल

प्रकाश महिपाळे
नायगाव : भारतीय जनगणना २०२६-२७ च्या प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत नायगाव तालुक्यातील तलबीड गावाने जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रशासकीय मार्गदर्शन आणि लोकसहभागाच्या जोरावर या गावाने १००% ‘स्वगणना’ (Self-Enumeration) पूर्ण करण्याचा बहुमान पटकावला असून, आधुनिक युगात डिजिटल क्रांतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या या उपक्रमाला तळबीडमध्ये मोठे यश मिळाले. उपविभागीय अधिकारी श्रीमती क्रांती डोंबे, तहसीलदार डॉ.धम्मप्रिया गायकवाड आणि उद्धव ढगे यांच्या समर्थ नियोजनामुळे हे उद्दिष्ट साध्य झाले. प्रशासकीय यंत्रणेने सोशल मीडिया आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून केलेल्या प्रभावी प्रबोधनाचा सकारात्मक परिणाम गावात दिसून आला.
या यशात गावातील आदर्श शिक्षिका सौ.चालीकवार मॅडम यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले. त्यांनी प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून गावातील तरुणांची फळी उभी केली. घरोघरी जाऊन स्वगणनेचे महत्त्व पटवून दिल्याने ग्रामस्थांनी स्वतःहून आपली माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदवली.
स्वगणनेचा टप्पा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर आता १६ मे पासून प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाला (Field Work) सुरुवात होणार आहे. नायगाव तालुक्यात यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, खालीलप्रमाणे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे:
पद संख्या
प्रगणक (Enumerators) २३९
पर्यवेक्षक (Supervisors) ४०
हे कर्मचारी प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन माहिती संकलित करतील. तळबीडमधील नागरिकांनी आधीच स्वगणना पूर्ण केल्यामुळे प्रगणकांचा वेळ वाचणार असून, अचूक डेटा संकलनास मदत होणार आहे.
या मोहिमेत नायब तहसीलदार सतीश कुलकर्णी, विजय येरावार, केंद्रप्रमुख मालू हनवटे, मच्छिंद्र सूर्यवंशी, विवेक एडके, गजानन पाटील आणि गावातील जागरूक युवकांचे विशेष सहकार्य लाभले.
“तलबीडच्या नागरिकांनी दाखवलेली ही जागरूकता आणि प्रशासनाचे नियोजन कौतुकास्पद आहे. १६ मे पासून सुरू होणाऱ्या प्रत्यक्ष गणनेच्या कामातही सर्व नागरिकांनी प्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे.”
— धम्मप्रिया गायकवाड तहसीलदार, नायगाव.



