पोलीसांच्या छत्रछायेखाली गुटखा विक्री : कहाळ्याच्या माफीयाला पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अभय

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : महाराष्ट्रात सन 2012 पासून गुटखा बंदी असतानाही नायगाव तालुक्यात पोलीस यंत्रणेच्या छत्र छायेखाली अवैध गुटखा विक्री सुरू आहे. तालुक्यातील कहाळा बु हे गाव गुटख्याचे माहेरघर बनले असून. येथूनच खेड्यापाड्यातील किराणा दुकान, जनरल स्टोअर्स व पानटपऱ्यांवर सर्वच कंपनीचा गुटखा खुलेआम पुरवठा करण्यात येत आहे.
FDA बघ्याच्या भूमिकेत, पोलिसांचे सुरक्षा कवच?
अवैध गुटखा विक्रीला प्रचंड ऊत आला असताना अन्न व औषध विभागाचे अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत. तर स्थानिक पोलिसांचे सुरक्षा कवच मिळत असल्याची चर्चा आहे. पोलिस विभाग खिसे भरण्याचे काम करीत असून गुटखा विक्री करणाऱ्यांना चक्क सुरक्षाही पुरवत असल्याचा आरोप होत आहे.
महिन्याला 50-75 लाखांची उलाढाल
नांदेड शहरातून टेंपो भरून गुटखा नायगावात येत असल्याने नायगाव तालुका होलसेल गुटख्याचे केंद्र बनले आहे. शेजारील कहाळा गाव गुटखा साठवण्याचे गोडाऊन झाले आहे. तेलंगाना व कर्नाटकातून देगलूर मार्गे येणारा गुटखा येथे साठवला जातो. या अवैध धंद्यात दरमहा 50 ते 75 लाखांची आर्थिक उलाढाल होत असल्याची माहिती आहे.
तीन तालुक्याला कहाळ्यातून पुरवठा
कहाळा येथील माफिया तीन तालुक्याला गुटखा पुरवत असून त्याला कुंटूर पोलिसांचे कवच असल्याचा आरोप आहे. IG च्या पथकानेही या माफियाकडे दुर्लक्ष केल्याने तो बिनदिक्कतपणे विक्री करत आहे. गुन्हे शाखेचा एक कर्मचारी या माफियाच्या सतत संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे.
सूत्रधार मोकाट
परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा राज्यात येतो. कधी माल पकडला जातो व वाहनचालकांवर कारवाई होते, पण सूत्रधारांना धक्का लागत नाही. त्यामुळे गुटखा माफियांवर वचक बसत नाही आणि बंदी फक्त कागदावरच राहिली आहे. बंदी असलेला गुटखा एवढ्या बिनबोभाटपणे विकला जात असताना स्थानिक पोलीस यंत्रणा धृतराष्ट्राची भूमिका घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे.



