ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

प्रशासकीय हलगर्जीपणाने घेतला आणखी एक बळी! सगरोळीत अवैध रेतीवाहू हायवाच्या धडकेत तरुण जागीच ठार ; महसूल अन् पोलिसांचे लक्तरे वेशीवर!

उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना सह आरोपी करण्याची मागणी...

प्रकाश महिपाळे

नांदेड :- बिलोली तालुक्यातील अवैध रेती उपसा आणि ओव्हरलोड वाहतुकीने आज सगरोळी येथे एका निष्पाप नागरिकाचा बळी घेतला आहे. देगलूर-बोधन रोडवरील सगरोळी येथील अनुसयानगरचे रहिवासी विठ्ठल लवटे हे अवैध आणि अमानुषपणे धावणाऱ्या ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या हायवाच्या (क्र. MH-20-GC-0790) चाकाखाली चिरडले गेले. विठ्ठल लवटे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण सगरोळी परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बिलोली तालुक्यातील गंजगाव, माचनूर आणि बोळेगाव येथे सध्या रेती घाटांवरून मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू आहे. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास बोळेगाव रेती घाटावरून ओव्हरलोड रेती भरून देगलूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या हायवाने अनुसयानगरजवळ विठ्ठल लवटे यांना जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की लवटे यांचा जागीच प्राण गेला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा कुटुंब कबीला असून, कमावता पुरुष गेल्याने हे कुटुंब आता उघड्यावर आले आहे.

पैशांच्या हव्यासापोटी प्रशासनाचे डोळे मिटले ; जनतेचा थेट आरोप!
या भीषण अपघातानंतर महसूल आणि पोलीस प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. तालुक्यातील तहसीलदार, पोलीस प्रशासन आणि आरटीओ (RTO) यांच्या अर्थपूर्ण देवाणघेवाणीमुळेच ही अवैध आणि ओव्हरलोड वाहतूक राजरोसपणे सुरू असल्याचा थेट आणि जाहीर आरोप आता जनतेतून केला जात आहे. “प्रशासनातील अधिकारी केवळ पैशांच्या हव्यासापोटी सामान्यांच्या जिवाशी खेळत आहेत,” अशा संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. या अपघाताला पूर्णपणे प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असून, दोषी अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

वरिष्ठांचे ‘मौन’ की मूकसंमती?
धक्कादायक बाब म्हणजे, बिलोली तालुक्यात रेती माफिया धुमाकूळ घालत असताना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या गंभीर प्रकरणावर चकार शब्द काढायला तयार नाहीत. कारवाई तर दूरच, पण साधे या प्रकरणाकडे लक्ष देण्याची तसदीही वरिष्ठांनी घेतलेली नाही. “आम्हाला रस्त्यावरून फिरू देणार आहात की नाही?” असा संतप्त सवाल आता सामान्य जनता जिल्हा प्रशासनाला विचारत आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतः दखल घेऊन, वेळोवेळी घडणाऱ्या या घटनांचा अहवाल मागवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

अवैध रेती वाहतुकीमुळे झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी प्रशासनाविरोधात जनतेचा तीव्र संताप! ओव्हरलोड वाहतुकीला मूकसंमती देणाऱ्या उपविभागीय अधिकारी (SDM) आणि तहसीलदार यांना या प्रकरणात सह-आरोपी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी आक्रमक मागणी आता जनतेमधून जोर धरू लागली आहे.

सध्या या घटनेचा पुढील तपास बिलोली पोलीस करीत आहेत. परंतु, केवळ चालकावर गुन्हा नोंदवून पोलीस या प्रकरणावर पांघरूण घालणार की, या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या रेती माफिया आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विठ्ठल लवटे यांच्या मृत्यूने सगरोळी परिसरात तीव्र संतापाची लाट असून, प्रशासनाविरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker