कृषी अधिकारी दिपेश देवरे सतत गैरहजर : बोगस बियाणे विक्रीत वाढ : आठ दिवसांत कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : तालुक्याचे कृषी अधिकारी दिपेश देवरे सतत गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पेरणीचे दिवस असूनही अधिकारी उपलब्ध नसल्याने नायगाव शहरात बोगस बियाणे विक्रीत वाढ झाली आहे, असा आरोप ‘छावा मराठा युवा महासंघा’ने केला आहे. छावा मराठा युवा महासंघाचे उपजिल्हा प्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी आज दि. 2 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन दिले.
नायगावचे कृषी अधिकारी दिपेश देवरे सतत गैरहजर राहतात. पेरणीच्या दिवसात शेतकरी मार्गदर्शन व बी-बियाण्यासाठी कार्यालयात येतात, मात्र अधिकारी भेटत नाहीत.
शासनाच्या अनेक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याऐवजी कार्यालयातील काही अधिकारी-कर्मचारी अडथळे निर्माण करतात. मागील नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शासनाने 60% अनुदानावर तुषार सिंचन योजना जाहीर केली. मात्र कृषी अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. अधिकारी उपलब्ध नसल्याने नायगाव शहरात बोगस बियाण्यांची विक्री वाढली आहे.
कारवाईची मागणी…
“कृषी कार्यालय शेतकऱ्यांना हेलपाटे व अडवणूक लावण्यासाठी आहे का?” असा सवाल करून दिपेश देवरे यांच्यावर 8 दिवसांच्या आत विभागीय चौकशी करून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 अंतर्गत सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे.
आंदोलनाचा इशारा…
कारवाई न झाल्यास छावा युवा मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.



