ताज्या बातम्यानांदेडनायगांव

कृषी सेवा केंद्रावर झालेल्या कारवाईचे स्वागत पण अडकून पडलेला १५ हजार खतांच्या बँगा शेतकऱ्यांना कधी मिळणार

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव :- खताच्या काळाबाजाराची तालुक्यातील शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्यामुळे शहरातील सात कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले. सात पैकी पाच खत विक्रेत्याकडे विविध प्रकारच्या खतांच्या तब्बल १५ हजार पोती असून त्यांना हा खत पुढील सहा महिने विक्री करता येत नाही. मात्र हा खत शेतकऱ्यांना उपलब्ध झाला पाहिजे यासाठी कृषी विभागाची कुठलीच तयारी नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची खताअभावी परवड सुरु झाली आहे.

नायगाव शहरातील सात कृषी सेवा केंद्राच्या बाबतीत तक्रारी झाल्या होत्या त्यामुळे कृषी विभागाने चौकशी केली होती. यात अनेक गंभीर चुका निदर्शनास आल्या त्यामुळे केदार कृषी सेवा केंद्र, वसंत ऍग्रो सर्विस सेंटर, गजानन कृषी सेवा केंद्र, दशरथ कृषी सेवा केंद्र, हनुमान कृषी सेवा केंद्र, मातोश्री ॲग्रो एजन्सी, श‍िवकृपा कृषी सेवा केंद्र अदिचे खत विक्री परवाने सहा महिण्यासाठी निलंबित करण्यात आलेत. या सात पैकी वसंत ऍग्रो सर्विस सेंटर २०८४, दशरथ कृषी सेवा केंद्र २७७२, गजानन कृषी सेवा केंद्र ४३२६, केदार कृषी सेवा केंद्र १५६५ व हनुमान कृषी केंद्र ३९७३ या पाच कृषी सेवा केंद्राकडे १४८४८ असा विविध प्रकारच्या खताचा साठा कृषी विभागाने सिल केला आहे. त्यामुळे वरील पाचही कृषी सेवा केंद्र चालकांना पुढील सहा महिने हा खतसाठा विक्री करता येत नाही.

कृषी विभागाच्या कारवाईने खताचा काळाबाजार करणाऱ्यांना दणका बसला आहे पण विविध प्रकारच्या १४८४८ खताची पोती अडकून पडली आहेत. ऐन खरिपाच्या हंगामात ही कारवाई झाली असून सिल केलेला खतसाठा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे यासाठी कृषी विभागाचे अधिकारी काहीही हलचाली करण्यास तयार नाहीत. परिणामी विविध प्रकारच्या खतासाठी शेतकरी बाजारात चकरा मारत आहेत पण त्यांना खत मिळत नाही.

सात कृषी सेवा केंद्रावर कारवाई होवून पंधरा दिवस होत आहेत पण कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे काहीही सोयरसुतक नाही असेच दिसून येत आहे. जर शेतकऱ्यांची काळजी असती तर कृषी विभागाने अधिकारी तातडीने त्या पाचही दुकानातील सिल केलेला खत शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिला असता पण असे होतांना दिसत नाही. त्यामुळे जगाच्या पोशिंद्याबद्दल कृषी विभागाचे अधिकारी किती असंवेदनशील आहेत हे उघड झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker