ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी नगरपालिकेचा गोरगरिबांच्या दुकानावर बुलडोझर; श्रीमंत व राजकीय पुढार्‍यांच्या अतिक्रमणांना मात्र अभय ?

◆नगरपालिका प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर स्थानिक नागरिकांचा संतप्त सवाल ! ◆ मुख्याधिकारी दीपक मोरे श्रीमंत व राजकीय पुढाऱ्यांच्या अतिक्रमणावर बुलडोझर चालवण्याची हिंमत दाखवतील काय ?

New Bharat Times नेटवर्क

कुंडलवाडी :- विकास आणि अतिक्रमण हटाव च्यख नावाखाली कुंडलवाडी नगर परिषद प्रशासनाने पुन्हा एकदा दुटप्पी भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. दि.८ जून रोजी कुंडलवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी मुख्य बाजारपेठेतील २४ लहान दुकानांवर धडक कारवाई करत त्यांचे अतिक्रमण हटवले. मात्र, या कारवाईमुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब आणि छोट्या व्यावसायिकांवर थेट उपासमारीची वेळ आली आहे. या एकतर्फी कारवाईमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून, “प्रशासन श्रीमंत आणि राजकीय पुढार्‍यांच्या अतिक्रमणावर हातोडा कधी चालवणार?” असा जळजळीत प्रश्न आता सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

गोरगरिबांच्या पोटावर लाथ; २४ कुटुंबांचा रोजगार हिरावला…
दि.८ जून रोजी नगर पालिकेच्या पथकाने मुख्य बाजारपेठेत अचानक कारवाईची मोहीम राबवली. यामध्ये अनेक वर्षांपासून छोटे-मोठे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या २४ गरीब दुकानदारांची दुकाने उद्ध्वस्त करण्यात आली. कोणतीही ठोस पर्यायी जागा न देता केलेल्या या कारवाईमुळे या गरीब व्यापाऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेल्याने या दुकानदारांच्या कुटुंबांवर उपासमारीची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

श्रीमंतांच्या आणि पुढार्‍यांच्या अतिक्रमणांकडे प्रशासनाचे ‘डोळेझाक’…
एकीकडे गरीब दुकानदारांवर तत्परतेने कारवाई करणाऱ्या मुख्याधिकारी दीपक मोरे यांना शहरातील मुख्य बाजारपेठ आणि विविध प्रभागांमध्ये बड्या लोकांनी केलेले अतिक्रमण दिसत नाही का, असा सवाल आता जनता विचारत आहे. शहरात अनेक ठिकाणी गर्भश्रीमंत व्यक्ती, व्यावसायिक आणि राजकीय वजन असलेल्या पुढार्‍यांनी नगरपालिकेच्या मोकळ्या जागांवर आणि गटारी,नाली,रस्त्यांवर पक्की बांधकामे करून अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो, तरीही पालिका प्रशासन त्यांच्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे.

मुख्याधिकारी ‘ती’ हिंमत दाखवणार का?
“विकासाच्या नावाखाली फक्त गोरगरिबांच्याच पोटावर लाथ मारली जाणार का?” असा संतप्त सवाल कुंडलवाडीतील नागरिक करत आहेत. राजकीय वरदहस्त असलेल्या आणि पैशाच्या जोरावर पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून श्रीमंत लोकाच्या बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालवण्याची हिंमत मुख्याधिकारी दीपक मोरे दाखवणार का? की पालिका प्रशासन फक्त गरिबांनाच टार्गेट करणार? याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. जर प्रशासनाने श्रीमंतांच्या अतिक्रमणावर तात्काळ कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांमधून दिला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker