ताज्या बातम्यानांदेडनायगांव

शेतातील जुगार अड्ड्यावर कुंटूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : १० जुगारी रंगेहात जेरबंद

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : शेताच्या आडोशाला सुरू असलेल्या अवैध पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर कुंटूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत १० जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी वाहने आणि जुगाराचे साहित्य असा १ लाख ६६ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर आणि कुंटूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए. एस. वाघतकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नागेश मामीडवार यांच्या शेतात काही जण तिरट नावाचा जुगार खेळत होते. माहितीची खातरजमा होताच कुंटूर पोलिसांनी सापळा रचून अचानक धाड टाकली. पोलिसांचा फौजफाटा पाहताच जुगारी पळ काढण्याचा प्रयत्न करू लागले; मात्र पोलिसांनी वेगवान हालचाली करत १० जणांना रंगेहात ताब्यात घेतले.

या कारवाईत रोख ९,१८० रुपये, ५ मोबाईल फोन, ३ दुचाकी वाहने, पत्त्यांचे संच व इतर साहित्य असा एकूण १ लाख ६६ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील हंबर्डे यांच्या फिर्यादीवरून मारोती भारत कदम, साईनाथ मोहन पिंपळे, कोंडिबा गणेश महादाळे, बालाजी यशवंत वाघमारे, संतोष नामदेव गायकवाड, स्वामी भीमराव रॅपणवाड, भगवान नागन निलेवार, भास्कर दत्तराम शिंदे, प्रभाकर मारोती शेळगावे आणि मगदूम असद शेख या दहा आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास जमादार मोहन खंदारे करीत आहेत. या धाडीत PSI कारामुंगे, जमादार मोहन खंदारे, कॉन्स्टेबल स्वप्नील हंबर्डे, कॉन्स्टेबल पल्लेवाड आणि कॉन्स्टेबल शिकारे यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कारवाईनंतर परिसरातील अवैध जुगार अड्डे चालवणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून, नागरिकांनी कुंटूर पोलिसांच्या धाडसी कारवाईचे स्वागत केले आहे. गावकऱ्यांनी आता जुगार, मटका आणि इतर अवैध धंद्यांवर सातत्याने अशाच कठोर कारवाया करण्याची मागणी केली आहे. पोलीस निरीक्षक ए. एस. वाघतकर यांनी पुढील काळातही अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker