कुंडलवाडी ते धर्माबाद राज्य महामार्गावरील बंद पथदिवे तातडीने सुरू करा ; नगरसेविका शितल विलास मोमईवार यांचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन
◆बंद पथदिव्यांमुळे अपघाताचा धौका वाढला

New Bharat Times नेटवर्क
कुंडलवाडी :- कुंडलवाडी–धर्माबाद राज्य महामार्ग क्र. २६८ वरील चुंगी नाका ते पोलीस ठाणे दरम्यानच्या दुभाजकावरील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारमय होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे..या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाच्या नगरसेविका शितल विलास मोमईवार यांनी दि.२४ जुलै रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन बंद असलेले पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कुंडलवाडी–धर्माबाद राज्य महामार्ग हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग असून या मार्गावरून दररोज हजारो वाहने आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र, पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना दुभाजक, वळणे तसेच समोरून येणाऱ्या वाहनांचा अचूक अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय अंधाराचा फायदा घेऊन चोरी, लुटमार किंवा इतर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावरील एवढ्या महत्त्वाच्या मार्गावरील पथदिवे बंद असणे ही गंभीर बाब असून नगर परिषदेच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नगरसेविका शितल मोमीईवार यांनी निवेदनाद्वारे चुंगी नाका ते पोलीस ठाणे दरम्यानच्या दुभाजकावरील सर्व बंद पथदिवे तात्काळ सुरू करावेत, तसेच पथदिव्यांच्या विद्युत पुरवठा, केबल, कंट्रोल पॅनल आणि इतर यंत्रणेची तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या जीविताची सुरक्षा लक्षात घेऊन नगर परिषद प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते, अशी भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



