मंडल विरुद्ध मनुवाद पुस्तकाचे ४ ऑक्टोबरला मुंबईत प्रकाशन

नांदेड : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीने रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता दादर येथील टिळक भवनात ‘मंडल विरुद्ध मनुवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.यशपाल भिंगे लिखित या पुस्तकात सामाजिक न्याय, संविधान, प्रतिनिधित्व आणि ओबीसींच्या हक्कांबाबत वैचारिक मांडणी करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ राहणार आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अमित देशमुख, माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा नानोरकर हे मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्राचे नवनियुक्त AICC प्रभारी डॉ. सिरिवेला प्रसाद यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.
शिबिरात ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनात्मक कार्य, सामाजिक न्याय, संविधान आणि ओबीसींच्या प्रश्नांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यातील ओबीसी विभागाचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



