२२व्या लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.आसाराम लोमटे

नांदेड : साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखक डॉ. आसाराम लोमटे यांची २२व्या लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई तथा यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ, करकाळा (ता. उमरी) यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.
या निवडीची माहिती लोकसंवादचे संयोजक दिगंबर कदम यांनी दिली. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सल्लागार समितीचे देवीदास फुलारी, प्रा. महेश मोरे आणि कथाकार राजेंद्र गहाळ यांनी डॉ.लोमटे यांची भेट घेऊन त्यांना पत्राद्वारे रीतसर निमंत्रण दिले.
ग्रामीण जीवन, सामाजिक वास्तव आणि मानवी प्रश्नांना आपल्या लेखनातून प्रभावीपणे मांडणारे डॉ. लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या नव्हेंबर मध्ये होणाऱ्या या साहित्य संमेलनाकडे साहित्यप्रेमींचे लक्ष लागले आहे



