स्वच्छता दूत माधवराव पाटील शेळगावकर यांना नायगाव येथे मॉर्निंग वॉक ग्रुप च्या वतीने स्वच्छता मोहीम राबवून अनोखी श्रद्धांजली…

नायगाव : संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा चालवणारे आणि आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश देणारे ‘स्वच्छता दूत’ माधवराव पाटील शेळगावकर यांच्या निधनानंतर, नायगाव येथील ‘मॉर्निंग वॉक ग्रुप’च्या वतीने केवळ शोकसभा न घेता प्रत्यक्ष स्वच्छता मोहीम राबवून त्यांना भावपूर्ण व आगळीवेगळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

शहरातील जयराज पॅलेस परिसरातील सार्वजनिक ठिकाणी श्रमदानातून ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमात तरुण, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसर चकाचक झाला.
या वेळी बोलताना उपस्थितांनी शेळगावकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. “माधवराव पाटलांनी स्वच्छता ही केवळ एक सवय न ठेवता त्याला लोकचळवळीचे रूप दिले होते. आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे हीच त्यांच्या कार्याची खरी पोहोचपावती आणि त्यांना दिलेली खरी आदरांजली ठरेल,” असा निर्धार या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.
उपस्थितांनी दोन मिनिटे शांतता पाळून दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना केली. तसेच संपूर्ण परिसर नियमित स्वच्छता राखण्याची सामूहिक शपथही घेण्यात आली.
या सामाजिक उपक्रमात परिसरातील लोकप्रतिनिधी, नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती सय्यद रहीम सेठ, साहित्यिक बालाजी पेटेकर सर, मुगावचे माजी सरपंच गणेश गाडले पाटील, शंकर तमणबोइनवाड, प्रशांत मोरे, बालाजी पांचाळ, आनंदा पांचाळ, प्रकाश महिपाळे, शेषेराव बेलकर, खुशाल शिंपाळे, मल्लिकार्जुन मठपती कृष्णुरकर, अर्जुन जाधव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



