कुंटूरकर शुगरकडून अपघाती मृत्यू झालेल्या ऊसतोड कामगाराच्या कुटुंबाला ३ लाखांची मदत ; ‘वारसांना पाठबळ देणे माझे कर्तव्य’ — चेअरमन राजेश देशमुख कुंटूरकर

नायगाव : “कुंटूरकर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात काम करत असताना अपघाती मृत्यू झालेल्या ऊसतोड कामगार, वाहतूकदार आणि मुकादमांच्या वारसांना आर्थिक आधार देणे हे माझे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन कुंटूरकर शुगरचे चेअरमन राजेश गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांनी केले. कारखान्याच्या १२ व्या हंगामाच्या बॉयलर प्रदीपन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
गतवर्षीच्या जानेवारी महिन्यात उमरा (ता. लोहा, जि. नांदेड) येथील ऊसतोड कामगार हिरामण काळबा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या दुर्देवी घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी कारखान्यातर्फे त्यांच्या पत्नी श्रीमती आशा हिरामण पवार यांना ३ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश चेअरमन राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
कुंटूरकर शुगर अँड ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडने नेहमीच समाजहिताच्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. कामगार व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील विवाहसोहळे, वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी कारखाना नेहमीच मदतीचा हात पुढे करतो. याशिवाय मोफत मेडिकल चेकअप, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर यांसारखे उपक्रम कारखान्याकडून सातत्याने राबवले जातात. अचानक कोसळलेल्या संकटाच्या वेळी कारखान्याने केलेली ही मदत पवार कुटुंबासाठी मोठा आधार ठरली आहे.
या कार्यक्रमास कुंटूरकर शुगरचे संचालक रुपेश भैय्या देशमुख, मुख्य सल्लागार उद्धवराव पतंगे, जनरल मॅनेजर टी.एस.भालेराव, मुख्य शेतकी अधिकारी सतीश देशमुख, चीफ अकाउंटंट ॲड. आनंद जाजू, चीफ इंजिनियर कदम साहेब यांच्यासह कारखान्यातील अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



