ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

केंद्रीय सहसचिव पी. नरहरी यांच्या उपस्थितीत येरगी येथे ग्रामसभा व ‘रिफॉर्म उत्सव’ उत्साहात संपन्न

शाश्वत ग्रामविकासासाठी ग्रामस्थांशी साधला थेट संवाद, येरगी येथील 'बालिका पंचायत' उपक्रमाचे विशेष कौतुक, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; जलतारा कामांचे भूमिपूजन व वृक्षारोपण संपन्न

नांदेड :- केंद्र सरकारचे सहसचिव पी. नरहरी यांच्या प्रमुख उपस्थितीत येरगी येथे ग्रामसभा व ‘रिफॉर्म उत्सव’ अत्यंत उत्साहात पार पडला. या वेळी श्री. नरहरी यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून शाश्वत ग्रामविकासाच्या दिशेने मार्गदर्शन केले, तसेच शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

रिफॉर्म उत्सवाच्या माध्यमातून प्रशासकीय सुधारणा आणि शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यात आली. या प्रसंगी श्री. नरहरी यांनी विविध योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधून त्यांच्या जीवनमानात झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती घेतली. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी लावलेल्या माहितीपटांचे व फलकांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

‘बालिका पंचायत’ उपक्रम अनुकरणीय…
येरगी येथील ‘बालिका पंचायत’ या उपक्रमाची विशेष दखल घेत श्री. नरहरी यांनी त्याचे भरभरून कौतुक केले. ग्रामीण भागातील मुलींमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे आणि त्यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणे यासाठी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

पर्यावरण व जलसंधारणावर भर…
या दौऱ्यादरम्यान श्री. नरहरी यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली, तसेच जलतारा कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. ग्रामस्थांनी एकत्र येऊन जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाच्या कामांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

महिलांचा विशेष व उत्स्फूर्त सहभाग…
या ग्रामसभेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महिलांची मोठी उपस्थिती होती. महिलांनी गावच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर आपली मते व सूचना मांडल्या.

या कार्यक्रमास नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध अधिकारी, कर्मचारी व येरगी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!