१५ वर्षांच्या सेवेनंतरही कर्मचारी वाऱ्यावर ; सोलापूर येथे उपोषणाचा इशारा आणि स्वेच्छा मरणाची मागणी!
'आपले सरकार सेवा केंद्र' ब्लॉक व्यवस्थापक (BM) कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्तीसाठी शासनाकडे धाव; ८ दिवसांत मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

प्रकाश महिपाळे
मुंबई : मागील १५ वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (ASSK) प्रकल्पातील सर्व तालुका / ब्लॉक व्यवस्थापकांना (BM) गेल्या वर्षभरापासून विना-नियुक्ती बेरोजगार राहावे लागत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे उपासमारीची वेळ आलेल्या या कर्मचाऱ्यांनी आता आरपारच्या लढ्याची भूमिका घेतली असून, येत्या ८ दिवसांत पुनर्नियुक्तीचा निर्णय न झाल्यास सोलापूर येथे तीव्र आंदोलन उभारून मा. राज्यपाल महोदयांकडे ‘स्वेच्छा मरणाची’ परवानगी मागण्याचा आणि देहदान करण्याचा गंभीर इशारा दिला आहे.
या संदर्भात ‘आपले सरकार सेवा केंद्र संगणक तज्ज्ञ ब्लॉक व्यवस्थापक (BM) कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य’ च्या वतीने मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व मा. ग्रामविकास मंत्री यांना संयुक्त निवेदन सादर करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व पंचायत समित्यांमधील तालुका व्यवस्थापक (BM) आणि जिल्हा व्यवस्थापक (DM) हे गेल्या १५ वर्षांपासून ग्रामविकास विभागाच्या ‘संग्राम’ आणि ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पांतर्गत तांत्रिक व व्यवस्थापकीय काम सांभाळत आहेत. ई-पंचायत प्रकल्प, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, ई-ग्रामस्वराज (E-Gramswaraj), जन्म-मृत्यू, विवाह नोंद, सरपंच-उपसरपंच-कर्मचारी मानधन, E-Tendering आणि विविध दाखले (G2C) मिळवून देण्यामध्ये या कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.
कंत्राट संपल्यानंतर १ वर्षापासून बेरोजगारी…
शासनाने नियुक्त केलेल्या संबंधित कंपनीची मुदत सप्टेंबर २०२५ मध्ये संपली. मात्र, त्यानंतर वर्षभर उलटूनही शासनाने या सर्व कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावलेला नाही. त्यामुळे हे कर्मचारी ऐन उमेदीच्या काळात बेरोजगार झाले आहेत.
आश्वासनांची हवेत विरझिण…
नागपूर हिवाळी अधिवेशनात कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी उपसचिवांनी १ महिन्यात ग्रामविकास मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे लेखी आश्वासन (दि. १३.१२.२०२५) दिले होते. परंतु, तब्बल ९ महिने उलटूनही अद्याप ही बैठक झाली नाही. तसेच संघटना प्रतिनिधींनी वारंवार मंत्रालय आणि बांधकाम भवन येथे फेऱ्या मारूनही शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही.
‘राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान’ (RGSA) संचालक पंचायत राज विभाग, पुणे यांच्या पत्रात (दि. ३०.०३.२०२६) स्पष्ट नमूद आहे की, आपले सरकार प्रकल्प सध्या तांत्रिक सहाय्याशिवाय चालवला जात आहे. RGSA आणि ‘आपले सरकार’ हे दोन्ही प्रकल्प वेगळे असताना, मूळ तांत्रिक मनुष्यबळ असलेल्या BM कर्मचाऱ्यांना घरी बसवून इतर कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले जात आहे, असा आरोप संघटनेने केला आहे.
कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी:
तात्काळ पुनर्नियुक्ती… ग्रामपंचायतीच्या केंद्रचालकांप्रमाणे सर्व तालुका व्यवस्थापकांना (BM) ‘आपले सरकार सेवा केंद्र’ प्रकल्पात तालुका व्यवस्थापक म्हणून तत्काळ पूर्ववत नियुक्ती देण्यात यावी.
मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा आणि स्वेच्छा मरणाचा इशारा…
“आम्ही आमच्या आयुष्याची १४ ते १५ वर्षे या प्रकल्पासाठी आणि शासनाच्या सेवा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी घालवली. आज आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. येत्या ८ दिवसांत शासनाने पुनर्नियुक्तीचा निर्णय घेतला नाही, तर सोलापूर येथे तीव्र आंदोलन केले जाईल व मा. राज्यपाल महोदयांकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागून आमचे शरीर शासन दरबारी दान केले जाईल.”
— कु. स्नेहल कांतीलाल पटेल (राज्याध्यक्ष)
सदरील निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय, ग्रामविकास मंत्री तसेच प्रधान सचिव व मुख्य सचिव यांना देण्यात आल्या आहेत.



