ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

चारा साक्षरता अभियान : रामतीर्थ येथे २ ऑक्टोबर रोजी निकृष्ट चारा सकस करण्याचे प्रात्यक्षिक ; पशुपालकांनी लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड: जिल्ह्यातील अल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि आगामी काळातील संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता, उपलब्ध चाऱ्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर करण्यासाठी जिल्ह्यात ‘चारा साक्षरता अभियान’ राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या संकल्पनेतून हे अभियान आयोजित करण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत आज, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी मौजे रामतीर्थ (ता. बिलोली) येथील गुणवंत शिवाजीराव देगलूरे यांच्या पशुपालन प्रक्षेत्रावर ‘निकृष्ट चारा सकस करणे’ या विषयावर विशेष प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे.

युरिया आणि काकवी प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक…
या प्रात्यक्षिकादरम्यान सोयाबीन कुटार आणि हरभरा कुटारावर युरिया व मोलासेस (काकवी) प्रक्रिया करण्याची शास्त्रीय पद्धत पशुपालकांना प्रत्यक्ष दाखवली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे उपलब्ध चाऱ्याची पौष्टिकता, पाचकता आणि रुचकरता वाढण्यास मदत होणार असून, याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. यासोबतच चाऱ्याचे योग्य संवर्धन, साठवणूक आणि व्यवस्थापन करून टंचाईच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा पशुधनासाठी प्रभावी वापर कसा करावा, याची माहिती देण्यात येणार आहे.

पशुपालकांना उपस्थित राहण्याचे आवाहन…
दुष्काळसदृश्य परिस्थितीत उपलब्ध चाऱ्याचा कार्यक्षम व शास्त्रीय वापर करणे अत्यंत आवश्यक असल्याने परिसरातील पशुपालकांनी या प्रात्यक्षिकाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे विविध अधिकारी व कर्मचारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!