ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा सत्तरीपुढे करण्याचा विचार व्हावा : न्यायमूर्ती अभय ओक

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे माणसाचे आयुर्मान वाढले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठीची वयोमर्यादा सत्तरीच्या पुढे करण्याचा विचार व्हावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान सोहळा व आनंद मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास न्यायमूर्ती अभय ओक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

निवृत्तीनंतर वयाच्या साठाव्या वर्षी आपण मानसिकदृष्ट्याही ज्येष्ठ झालो आणि सार्वजनिक जीवनातून निवृत्त झालो, अशी भावना ज्येष्ठ नागरिकांनी मनात ठेवू नये, असे अभय ओक यांनी सांगितले. साठीनंतरची ‘तिसरी इनिंग’ राष्ट्रकार्य, समाजकार्य आणि सर्जनशील कार्यासाठी द्यावी. ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव, ज्ञान आणि कौशल्ये समाजाच्या विकासासाठी तसेच पुढील पिढीच्या जडणघडणीसाठी महत्त्वाची आहेत. पर्यावरण बदलाचे गांभीर्य लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी ज्येष्ठ नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि पर्यावरणीय समतोलासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यशवंतराव चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी अध्यक्षीय समारोपात पिढ्यांमधील अंतर कमी करण्याची गरज व्यक्त केली. दोन्ही पिढ्यांनी एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांनी तरुणांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करावेत, तर तरुणांनी ज्येष्ठांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा आदर करावा. संवादातून पिढ्यांमधील अंतर कमी होऊन समावेशक समाजाकडे वाटचाल होईल, असे त्यांनी सांगितले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणारे प्रकाश घादगिने, लातूर; बबन पाटणकर, ठाणे; भागीरथी बच्चेवार, नांदेड; वृषाली मगदूम, रायगड; मानव कांबळे, पुणे; जनसेवा फौंडेशन, पुणे आणि ज्येष्ठ नागरिक संघ, चोपडा, जळगाव यांना ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उदय रामदास आणि मृण्मयी फाटक यांच्या ‘नादब्रह्म टीम’ने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. ज्येष्ठ नागरिकांसाठी पार्किन्सन्स आजाराबाबत मार्गदर्शन सत्रही आयोजित करण्यात आले. प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. अनिल वेंकटाचारी यांनी पार्किन्सन्सची लक्षणे, त्यावरील नियंत्रण, निरोगी जीवनशैली आणि दीर्घकाळ सक्रिय जीवन जगण्याबाबत मार्गदर्शन केले. सुरज भोईर यांनी प्रार्थना सादर केली. यावेळी विजय कान्हेकर, विभागाचे संयोजक, यांनी प्रास्ताविकातून सेंटरच्या वतीने चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. ॲड. प्रमोद ढोकले यांनी निवड समितीच्या वतीने प्रातिनिधिक विचार मांडले.

विभागाचे प्रमुख दीपिका शेरखाने यांनी आभार मानले. प्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मनिषा खिल्लारे, वंदना वाळीकर, मीनल सावंत, प्रशांत इखर, अशोक जाधव आणि सुरज पवार यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!