ताज्या बातम्यानांदेडनायगांव

महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे शेतरस्ता बंद; शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा!

एक वर्षापासून तक्रारी, मोजणीचा अहवालही सकारात्मक ; तरीही रस्ता खुला करण्यास प्रशासनाची टाळाटाळ

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : मौजे रुई (बु.) येथील गट क्र. ३४७ मधील शेतकऱ्यांचा पारंपरिक पाणंद/शेतरस्ता कथितरीत्या बंद करण्यात आल्याने महसूल विभागाच्या कारभारावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरापासून तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि भूमिअभिलेख विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने अखेर संबंधित शेतकऱ्यांनी दि. ९ आक्टोबर पासून अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

रुई बु. येथील शेतकरी बालाजी मारोती गोरटकर यांच्या म्हणण्यानुसार, सदर शेतरस्त्याचा वापर अनेक वर्षांपासून शेतात व घराकडे जाण्यासाठी केला जात आहे. मात्र, गटधारक दिलीप संभाजी पांडे यांनी पाणंदेवर माती व दगड टाकून रस्ता बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणेही कठीण झाले असून पिकांची मशागत व देखभाल करणे अडचणीचे बनले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी महसूल विभाग, तहसील कार्यालय, पंचायत समिती तसेच भूमिअभिलेख कार्यालयाकडे वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. मंडळ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अधिकृत मोजणीद्वारे पाणंद/रस्ता खुला करणे योग्य असल्याचा अहवाल दिल्याचे निवेदनात नमूद आहे. तरीदेखील प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शासकीय आदेश, कागदपत्रे आणि अहवाल उपलब्ध असतानाही कारवाई का रखडली? संबंधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने तातडीने अधिकृत मोजणी करून बंद केलेला शेतरस्ता दि. ८ आक्टोबर पर्यंत खुला करावा, अन्यथा नायगाव तहसील कार्यालय व पंचायत समितीसमोर दि. ९ आक्टोबर २०२६ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा बालाजी मारोती गोरटकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

उपोषणाच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी महसूल प्रशासन, भूमिअभिलेख विभाग व रस्ता बंद करणाऱ्या व्यक्तीवर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एक वर्ष तक्रारी, अहवाल तयार; मग कारवाईला मुहूर्त कधी? हा प्रश्न आता रुईच्या शेतकऱ्यांकडून महसूल प्रशासनाला विचारला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!