दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी विजयकुमार घाडगे पाटील यांची शेतकरी संवाद यात्रा नायगाव तालुक्यात ; गडगा, देगाव येथे शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अंकुशकुमार देगावकर
नायगाव :- मराठवाड्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांतील शेतकरी गंभीर संकटाचा सामना करत आहेत. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, शेतीच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांनी मराठवाड्यात शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा आणि दुष्काळाच्या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या यात्रेअंतर्गत नायगाव तालुक्यातील गडगा आणि देगाव येथे शेतकरी संवाद सभांचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही गावांत शेतकरी, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

गडगाव येथे सायंकाळी चार वाजता शेतकरी संवाद सभेला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहून त्यांनी शेतीसमोरील अडचणी, पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती आणि शासनाकडून अपेक्षित असलेल्या मदतीबाबत आपली भूमिका मांडली. त्यानंतर देगाव येथे सायंकाळी सात वाजता संवाद सभा पार पडली. या सभेलाही गावातील तसेच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या संवाद यात्रेला दोन्ही गावांत चांगला प्रतिसाद मिळाला.
कोरड्या दुष्काळाच्या संकटाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
मराठवाड्यातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असल्याने पावसातील खंडाचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होत आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत असताना उत्पादनाची शाश्वती नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना ठोस मदत मिळणे आवश्यक आहे.
शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविणे आणि दुष्काळी परिस्थितीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी सरकारला जाब विचारणे, हा या दौऱ्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळावी, शेतीचे नुकसान लक्षात घेऊन योग्य उपाययोजना राबवाव्यात आणि शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी छावा संघटना मैदानात या संवाद सभेला संबोधित करण्यासाठी शेतकरी नेते तथा अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, नांदेड जिल्हाध्यक्ष माधवराव ताटे पाटील,लातूर जिल्हा अध्यक्ष दीपक नरवडे,रंजित देशाई,हणमंत शिंदे,युवक चे रंजीत ताटे,विनायक माहेगावकर,राजेश मोरे तसेच देगांव व गडगा गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष जेष्ठ गावकरी मंडळी यांच्यासह छावा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी केवळ स्थानिक पातळीवर न राहता शासनाच्या निदर्शनास आणून देणे आणि त्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक असल्याची भूमिका या संवाद यात्रेतून मांडण्यात आली.
नायगाव तालुक्यातील गडगा आणि देगाव येथे झालेल्या सभांमुळे शेतकऱ्यांना आपल्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणत दुष्काळाच्या संकटाविरोधात जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरत आहे.
तालुक्यातील पदाधिकाऱ्यांकडून आयोजन या शेतकरी संवाद दौऱ्याचे नियोजन आणि आयोजन अखिल भारतीय छावा संघटनेचे नायगाव तालुकाध्यक्ष साई पाटील मोरे देगावकर,साई पाटील मोकासदरेकर यांनी केले. सभांच्या यशस्वी आयोजनासाठी छावा संघटनेचे कार्यकर्ते तसेच स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले.
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांच्या प्रश्नांना शासनदरबारी मांडण्याचा निर्धार या शेतकरी संवाद यात्रेतून व्यक्त करण्यात येत आहे. आता या प्रश्नांवर शासन कोणत्या उपाययोजना करते आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कितपत दिलासा मिळतो, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.



