ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नरसीत दिवसाढवळ्या धाडसी चोरी ; रामतीर्थ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

१५ दिवसांत दिवसा चोरीची दुसरी घटना ; ३ लाख ८० हजारांची रोकड आणि सोन्याच्या अंगठ्या लंपास

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरसी येथे चोरट्यांनी पोलिसांना जणू काही आव्हानच दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गुरुवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास शामनगर परिसरातील प्रभाकर कोंडीबा गायकवाड यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाट फोडून बांधकामासाठी ठेवलेली तब्बल ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड आणि पाच-पाच ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, असा ऐवज लंपास केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नरसी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रभाकर गायकवाड यांच्या घराचे बांधकाम सुरू असून बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी ते शेषराव हनमंते यांच्या घरात भाड्याने राहत होते. गुरुवारी सकाळी गायकवाड बाहेरगावी गेले होते, तर त्यांच्या पत्नी ड्युटीवर गेल्या होत्या. दुपारी एक वाजेपर्यंत परिसरातील महिला घराबाहेर असल्याने चोरट्यांनी त्यानंतरच्या वेळेचा फायदा घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घरात कोणी नसल्याचे हेरून चोरट्यांनी कुलूप तोडले आणि कपाट फोडून रोकड व सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या. चोरीची माहिती मिळताच रामतीर्थ पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. श्वान पथकही दाखल झाले; मात्र चोरट्यांचा माग काढण्यात यश आले नसल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे, नरसी येथे गेल्या पंधरा दिवसांत दिवसाढवळ्या चोरीची ही दुसरी घटना असल्याने पोलिसांच्या गस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. परिसरात चोरीच्या घटना घडत असताना पोलिसांचा धाक नेमका कुठे आहे? चोरटे दिवसाढवळ्या घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज घेऊन जात असतील, तर पोलिसांची गस्त नेमकी कोणासाठी आणि कुठे आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

यापूर्वी घडलेल्या चोरीच्या घटनांचा तपास कितपत पुढे गेला, किती आरोपी जेरबंद झाले आणि किती चोरीचा मुद्देमाल हस्तगत झाला, याची माहिती पोलिसांनी सार्वजनिक करण्याची गरज आहे. अन्यथा चोरीची घटना घडणे, पंचनामा करणे, श्वान पथक बोलावणे आणि अखेरीस प्रकरण तपासाच्या नावाखाली दप्तरी ठेवणे, एवढ्यापुरतीच पोलिसांची भूमिका मर्यादित राहणार का, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!